
वुमन्स टीम इंडियाने कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात विशाखापट्टणममध्ये मंगळवारी 23 डिसेंबर झालेल्या दुसऱ्या टी 20I सामन्यात श्रीलंकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने शफाली वर्मा हीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 129 धावांचं आव्हान सहज पूर्ण केलं. भारताने 11.5 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून हे आव्हान गाठलं. भारताचा हा या मालिकेतील सलग दुसरा विजय ठरला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी मिळवली. ओपनर शफालीने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. शफालीने 34 बॉलमध्ये 203 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 69 रन्स केल्या. शफालीने त्यापैकी 46 धावा या फक्त चौकार आणि षटकाच्या मदतीने केल्या. शफालीने 69 धावांच्या खेळीत 10 चौकार आणि 1 षटकार लगावला. शफालीला तिच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. शफालीने यासह टीम इंडियाची उपकर्णधार स्मृती मंधाना हीला मागे टाकलं.
शफालीने मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकताच (POTM) स्मृतीला पछाडलं. शफालीने पोओटीम अवॉर्ड जिंकण्याबाबत स्मृतीला मागे टाकलं. शफाली यासह टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा हा पुरस्कार जिंकणारी तिसरी भारतीय खेळाडू ठरली. शफालीची सामनावीर होण्याची ही आठवी वेळ ठरली. तर भारतासाठी सर्वाधिक वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकण्याचा विक्रम हा माजी कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हीच्या नावावर आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तसेच स्मृतीव्यतिरिक्त ऑलराउंडर दीप्ती शर्मा आणि जेमीमाह रॉड्रिग्स यांनीही प्रत्येकी 7-7 वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.
स्मृती मंधाना : 7
दीप्ती शर्मा : 7
जेमीमाह रॉड्रिग्स : 7
शफाली वर्मा : 8
हरमनप्रीत कौर : 11
मिताली राज : 12
“सुरुवातीला बॉल थोडा थांबून येत होता. त्यामुळे मी एकेरी धावा घेण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत कसं खेळायचं याबाबत कोचने सांगितलं. माझ्यासाठी ही एक चांगली खेळी होती. मी स्वत:ला या खेळीदरम्यान फार शांत ठेवलं. मी हवेत फार कमी खेळले. जमीनीवरुन फटके मारले तर धावा करु शकते हे मला माहित आहे”, असं शफालीने नमूद केलं.