
वूमन्स टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप विजयानंतर आपला दबदबा कायम ठेवला आहे. टीम इंडिया सध्या मायदेशात श्रीलंकेविरुद्ध 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळत आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात या मालिकेत अप्रतिम सुरुवात केली आहे. महिला ब्रिगेडने या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने 21 आणि 23 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेवर सहज आणि सोपा विजय मिळवला. भारतान यासह या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडी घेतली आहे. भारताने या सलग विजयांसह मालिकेवर हात ठेवला आहे.
उभयसंघातील मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना (India Women vs Sri Lanka Women 3rd T20I) फार निर्णायक आणि अटीतटीचा असणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्यासह मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला मालिकेत कायम रहायचं असेल तर कोणत्याही स्थितीत हा तिसरा सामना जिंकावा लागणार आहे. श्रीलंकेसमोर या सामन्यात विजयाचं खातं उघडून भारताला मालिका जिंकण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारतीय संघाचा सलग 2 विजयासह विश्वास दुणावलेला आहे.
चमारी अट्टापट्टू हीच्या नेतृत्वात श्रीलंकेचे फलंदाज पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरले. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेला दोन्ही सामन्यात 130 धावांपर्यंतही पोहचता आलं नाही. त्यामुळे भारताने विजयासाठी मिळालेलं आव्हान हे सहज पूर्ण केलं. भारताने पहिला सामना हा 8 तर दुसरा सामना 7 विकेट्सने जिकंला. पहिल्या सामन्यात जेमिमाह रॉड्रिग्स हीने अर्धशतक करत विजयात योगदान दिलं. तर ओपनर शफाली वर्मा हीने नाबाद अर्धशतक करुन भारताला सलग दुसरा विजय मिळवून दिला. त्यामुळे कॅप्टन हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीची महिला ब्रिगेड मालिका विजयासाठी सज्ज आहे. आता तिसऱ्या सामन्यात मालिकेचा निकाल लागतो की श्रीलंका पलटवार करण्यात यशस्वी ठरते? यासाठी निकालापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यातील तिसरा टी 20I सामना हा शुक्रवारी 26 डिसेंबरला होणार आहे. सामन्याचं आयोजन हे तिरुवनंतरुपममधील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.