IND vs SL : भारत श्रीलंका दुसरा वनडे सामना होणार की नाही? या बातमीने क्रीडाप्रेमींचं वाढलं टेन्शन
भारत आणि श्रीलंका वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे. मालिकेतील आघाडीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. असं असताना दुसरा वनडे सामना होणार की नाही? याबाबत शंका आहे. नेमकं काय आणि कशासाठी ते जाणून घ्या

भारत श्रीलंका यांच्यात वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी म्हणजेच 4 ऑगस्टला होणार आहे. हा सामना कोलंबोतील प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार आहे. याच मैदानावर झालेला पहिला सामना ड्रॉ झाला होता. आता दुसऱ्या सामन्यात काय निकाल लागतो आणि कोण आघाडी घेते याची उत्सुकता लागून आहे. त्यामुळे दोन्ही संघांवर या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दडपण असणार आहे. पण हा सामना होईल की नाही याबाबत साशंकता आहे. कारण हवामान खात्याने वर्तवलेला अंदाज पाहता क्रीडारसिकांची धाकधूक वाढली आहे. पहिल्या सामन्यातही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला होता. मात्र हा सामना निर्विघ्नपणे पार पडला. तसाच रविवारी पाऊस पडणार नाही, अशी आशा क्रीडारसिकांना आहे. पण यावेळी पावसाची शक्यता जास्त असल्याचं दिसत आहे. त्यामुळे सामन्यात पावसाचा व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार षटकं कमी करण्याची किंवा सामना रद्द करण्याची वेळ येऊ शकते.
अॅक्युवेदरनुसार, 4 ऑगस्ट रोजी दुपारी 73 टक्के, तर संध्याकाळी 70 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तापमान 28 ते 30 अंश असेल. तर हवामानाती आर्द्रता 80 टक्के असेल. दुसरीकडे, खेळपट्टीबाबत सांगायचं तर फिरकीपटूंना मदत करणारी असेल यात शंका नाही. पहिल्या वनडेत श्रीलंकेच्या फिरकीपटूंनी भारताच्या 10 पैकी 9 विकेट घेतल्या आहेत. तर भारताच्या फिरकीपटूंनी 8 पैकी 4 विकेट घेतल्या आहेत. भारत आणि श्रीलंका यांनी आतापर्यंत एकमेकांविरुद्ध 169 वनडे सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 99 आणि श्रीलंकेने 57 सामने जिंकले आहेत. तर उर्वरित सामने निकालाविना संपले आहेत.
वनडे मालिकेसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबूमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
दरम्यान, भारताने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी20 मालिका 3-0 ने जिंकली. यासह भारताने श्रीलंकेला क्लिन स्वीप दिला. दुसरीकडे, वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकण्याची भारताला संधी होती. पण भारताने ती गमावली. त्यामुळे मालिकेत आता 0-0 ने बरोबरी आहे.
