IND vs SLXI: सराव सामन्याच्या पहिल्या दिवसावर श्रीलंकेची पकड, भारताने त्याच चुकांचा पाढा वाचला
भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यातील सराव सामन्याचा पहिला दिवस संपला. या दिवसावर श्रीलंकेची मजबूत पकड दिसली. श्रीलंकेने 90 षटकं खेळून 8 गडी गमवून 363 धावांपर्यंत मजल मारली आहे.

भारत आणि श्रीलंका इलेव्हन यांच्यातील तीन दिवसीय सराव सामन्याचा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसखेर श्रीलंकेने 8 गडी गमवून 363 धावा केल्या. यासह पहिला दिवस श्रीलंकन फलंदाजांनी गाजवला असं म्हणायला हरकत नाही. श्रीलंकेचे फलंदाज बाद करताना भारतीय गोलंदाजांचा कस लागला. त्यामुळे कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी ही धोक्याची घंटा आहे. सराव सामन्यातून धडे घेऊन भारताने आता पुढची रणनिती आखणं गरजेचं आहे. भारताकडून मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि सारांश जैन यांच्यात खात्यात एकही विकेट गेली नाही. तर रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतली. तर गुरनूर ब्रारच्या खात्यात एक विकेट आली. खरं तर या विकेटसाठी पहिल्या दिवशी श्रीलंकन फलंदाजी भारतीय गोलंदाजांना खूपच झुंजवलं. त्यामुळे धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
श्रीलंकेचा डाव
निशान मदुष्का आणि रविंदू रसंथा यांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी या दोघांनी 110 धावा जोडल्या. निशान बाद झाल्यानंतर पसिंदू सूरियाबंदारा याची साथ रविंदू रसंथाला लाभली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. पसिंदू 35 धावांवर असताना रवींद्र जडेजाने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर लगेचच रविंदू रवंथा 71 धावांवर तंबूत परतला. पवन रत्नायके 39, अहान विक्रमसिंघने ने 31 धावा केल्या. त्यानंतर कर्णधार सोनल दिनुषाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. त्याने 71 चेंडूत 52 धावा केल्या आणि बाद झाला. अंजला बंदाराने 13, रमेश मेंडिसने 32 धावांची खेळी केली आणि तंबूत परतले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केशरा नुवान्था नाबाद 9 आणि दिलुम सुदीरा नाबाद 1 धावेवर खेळत आहे.
भारतीय खेळाडूंकडून सामन्यात काय चुकलं?
टी ब्रेकनंतर भारतीय फिरकीने आपली जादू दाखवली. रवींद्र जडेजाने महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. तसेच भागीदारी तोडण्यात मोलाचा हातभार लावला. कुलदीप यादव आणि मानव सुथार या दोन्ही फिरकीपटूंनी अचूक गोलंदाजी करत प्रत्येकी 2-2 बळी घेतले. वेगवान गोलंज या सामन्यात दिशाहिन दिसले. पण या सामन्यात झेल सोडण्याची चूक घडली. डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर श्रीलंकेचा फलंदाज रविंदू सहज बाद झाला असता. पण स्लिपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार केएल राहुलकडे सोपा झेल सोडला. केवळ राहुलच नाही, तर लंच ब्रेकनंतर देवदत्त पडिक्कलनेही रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर एक सोपा झेल सोडून दिला.