
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका असल्याने या सामन्याचं महत्त्व आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करून परतला आहे. पण मागच्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कटू आठवणी आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ताकही फुंकून प्यावं लागणार आहे. वेस्ट इंडिजने भारताला शेवटचा कसोटी सामना मे 2002 मध्ये हरवला होता. म्हणजेच 23 वर्षे भारताला पराभूत करता आलं नाही. 25 कसोटीपूर्वी वेस्ट इंडिजला हे यश मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनिप 2025-2027 स्पर्धेतील ही दुसरी कसोटी मालिका आहे. त्यामुळे भारताला विजयी टक्केवारी वाढवण्याची मोठी संधी आहे. मागच्या पर्वात भारताला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी खेळण्याची संधी हुकली होती. दरम्यान, नाणेफेकीचा कौल वेस्ट इंडिजच्या बाजूने लागला. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस याने प्रथम फलंदाजीला प्राधान्य दिलं आहे.
वेस्ट इंडिजचा कर्णधार रोस्टन चेस म्हणाला की, ‘आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसते. थोडा ओलावा असेल, कसोटी क्रिकेट आहे आणि आम्हाला पहिले काही तास हाताळावे लागतील. हा एक तरुण संघ आहे. आम्हाला मैदानात येऊन चांगले क्रिकेट खेळायचे आहे. आम्हाला या खेळपट्टीवर शेवटच्या दिवशी फलंदाजी करायची नाही कारण आम्हाला माहित आहे की तो वळेल. आम्ही दोन वेगवान गोलंदाज, दोन स्पिनर आणि एक ऑलराउंडर घेऊन खेळत आहोत.’
शुबमन गिल म्हणाला की, ‘वर्षाच्या अखेरीस मायदेशी आपल्याला चार कसोटी सामने खेळायचे आहेत. आम्हाला चारही जिंकायचे आहेत. तयारी चांगली झाली आहे. सर्वजण चांगल्या टचमध्ये आहेत. रेड-बॉल मानसिकतेत उतरण्याबद्दल मनाची तयारी आहे. खेळपट्टी सपाट दिसते. टॉस गमावल्याने निराश नाही. सुरुवातीला काही मदत मिळू शकते. आमच्याकडे दोन वेगवान गोलंदाज आहेत. संघात बुमराह आणि सिराज, तीन फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन आणि कुलदीप आहे. तर अष्टपैलू नितीश रेड्डीचा संघात समावेश केला आहे.’
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): टॅगेनरीन चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, अॅलिक अथानाझे, ब्रँडन किंग, शाई होप (विकेटकीपर), रोस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रीव्हज, जोमेल वॉरिकन, खॅरी पियरे, जोहान लेन, जेडेन सील्स.