IND vs WI : आता थांबायचं नाय! टीम इंडिया विंडीज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज, बुमराहला काय झालं?
India vs West Indies Test Series 2025 : आशिया कप स्पर्धेची सांगता होताच भारतीय संघ मायदेशातील कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 2 ते 14 ऑक्टोबर दरम्यान कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी भारताने जोरदार सराव केला.

टीम इंडिया आशिया कप ट्रॉफी जिंकल्यानंतर आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सलग 7 सामने जिंकून नवव्यांदा आशिया कप जिंकला. त्यानंतर काही तासांमध्ये भारतीय खेळाडूत मायदेशी परतले. त्यानंतर टीम इंडिया आता रेड बॉल क्रिकेटसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात विंडीज विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेला 2 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. शुबमन गिल या मालिकेत भारताचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियाने या मालिकेसाठी सरावाला सुरुवात केली आहे.
उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 2 ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. त्याआधी टीम इंडियाने मंगळवार 30 सप्टेंबरपासून नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सरावाला सुरुवात केली आहे. भारतीय संघाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात जवळपास 3 तास सराव केला.
सरावाला तिघांची गैरहजेरी
टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोरदार सराव केला. मात्र या दरम्यान टीम इंडियाचे 3 प्रमुख गोलंदाज यावेळेस दिसले नाहीत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तसेच कुलदीप यादव आणि अक्षर पटेल ही फिरकी जोडी सरावादरम्यान दिसली नाही. त्यामुळे हे तिघे कुठे होते? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
वेगवान गोलंदाजांचा जोरदार सराव
इंग्लंड दौऱ्यातील स्टार जोडी प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या जोडीने अहमदाबादमध्ये जवळपास पाऊण तास गोलंदाजीचा सराव केला. हे दोघे नुकत्याच ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध झालेल्या अनऑफिशियल टेस्ट मॅचमध्ये खेळले होते. त्यामुळे कसोटी मालिकेत या दोघांच्या कामिगरीकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
सलामी जोडीची जोरदार तयारी
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाला नवी सलामी जोडी मिळाली. केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल या जोडीने इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियासाठी ओपनिंग केली. या जोडीनेही अहमदाबादमध्ये घाम गाळला. तसेच विकेटकीपर ध्रुव जुरेल, साई सुदर्शन आणि देवदत्त पडीक्कल यांनीही सराव केला.
दरम्यान टीम इंडियाची ही विंडीज विरुद्धची पहिली आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 साखळीतील दुसरी कसोटी मालिका असणार आहे. ही मालिका मायदेशात होत असल्याने टीम इंडिया उत्सूक आहे. या मालिकेत शुबमन गिल भारताचं नेतृत्व करणार आहे. ऑलराउंडर रवींद्र जडेजा उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
