IND Vs ZIM T20: भारताचा झिम्बाब्वेला क्लिन स्वीप, तिसऱ्या सामन्यात 35 धावांनी नमवलं
भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेला 3-0 ने नमवलं. तिसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही गाठता आलं नाही.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारताने झिम्बाब्वेला पराभवाची चाखली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. मात्र झिम्बाब्वे दौऱ्यात भारताने या पराभवाची वसुली केली आहे. भारताने झिम्बाब्वेला तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 3-0 ने मात दिली. तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 192 धावा केल्या आणि विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना सुरूवातीच्या षटकात झिम्बाब्वेच्या धावगतीला ब्रेक बसला. त्यामुळे धावांचं अंतर वाढत गेलं. त्यामुळे अंतर कमी करताना शेवटच्या षटकात झिम्बाब्वेच्या खेळाडूंची दमछाक झाली. भारताने या सामन्यात झिम्बाब्वेला 35 धावांनी नमवलं.
भारताचा डाव
भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. या जोडीकडून फार अपेक्षा होत्या. पण अभिषेक शर्मा फक्त 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि इशान किशन यांची जोडी जमली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 75 धावांची भागीदारी केली. इशान 29 धावा करून बाद झाला. त्यानंतर वैभव आणि श्रेयस अय्यरने डाव पुढे नेला. या दोघांनी मिळून 50 धावा जोडल्या. पण आक्रमक फटकेबाजी करताना वैभव सूर्यवंशी बाद झाला. वैभव सूर्यवंशीने 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरचा डावही 27 धावांवर आटोपला. तर रिंकु सिंह 14 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. तिलक वर्माने 9 चेंडूत 11 धावा केल्या आणि नाबाद राहिला.
गोलंदाजीत भारताकडून मयंक यादवने सकारात्मक सुरूवात करून दिली. पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटची विकेट काढली. त्यामुळे पावरप्लेमध्ये झिम्बाब्वेचा डाव फसला. धावगतीला ब्रेक लागल्याने झिम्बाब्वेने पावरप्लेमध्ये 3 गडी गमवून 53 धावा केल्या. मयंक यादवने चार षटकात 29 धावा देत तीन गडी बाद केले. अशोक शर्माने 4 षटकात 20 धावा देत 1 गडी बाद केला. तर रवि बिष्णोईने 4 षटकात 24 धावा देत 1, यश ठाकुरने 4 षटकात 45 धावा देत 2 गडी बाद केले.