IND vs ZIM : वैभव सूर्यवंशीचा मालिकावीराच्या पुरस्काराने गौरव, मालिकेत काय घडलं? ते सर्व काही सांगून टाकलं
झिम्बाब्वे दौऱ्यात चमकदार कामगिरी केल्याने वैभव सूर्यवंशीचा सामनावीर आणि मालिकावीराच्या पुरस्कारने गौरव करण्यात आला. या पुरस्कारानंतर वैभवने आपलं मन मोकळं केलं. या स्पर्धेसाठी केलेली तयारी आणि मेहनत यावर त्याने भाष्य केलं.

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी20 मालिका नुकतीच पार पडली. खरं तर या मालिकेत श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची कसोटी लागली होती. मात्र टीम इंडिया पुन्हा एका चॅम्पियन संघासारखी खेळली. आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेतील पराभवाचं नैराश्य झटकून झिम्बाब्वेत चमकदार कामगिरी केली. भारताने या मालिकेत तिन्ही सामन्यात झिम्बाब्वेला लोळवलं आणि 3-0 ने क्लिन स्वीप दिला. या मालिकेत वैभव सूर्यवंशीचं नाणं खणखणीत वाजलं. त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारताला विजय मिळवणं सोपं झालं. त्याने तीन सामन्यात एकूण 77 चेंडूंचा सामना केला आणि 151 धावा केल्या. पहिल्या सामन्यात 19 चेंडूत 50, दुसऱ्या सामन्यात 9 चेंडूत 20 आणि तिसऱ्या सामन्यात 49 चेंडूत 81 धावांची खेळी केली. त्याने 196.10 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी मालिकावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. तर तिसर्या सामन्यातील खेळीमुळे सामनावीराचा पुरस्कार मिळाला. या पुरस्कारानंतर त्याने आपलं मत व्यक्त केलं.
काय म्हणाला वैभव सूर्यवंशी?
वैभव सूर्यवंशीला सामनावीर आणि मालिकावीर असे दोन्ही पुरस्कार मिळाले. त्यानंतर त्याने यावर आपलं मत व्यक्त करताना कामगिरीवर आनंद व्यक्त केला. वैभव म्हणाला की, ‘हरारेला आल्यानंतरच्या दोन-तीन दिवसांत आमची तयारी खूप चांगली झाली. मी इथे 19 वर्षांखालील विश्वचषकही खेळलो आहे, त्यामुळे मला या मैदानावर खेळायला खूप आवडतं. कर्णधार, प्रशिक्षक, सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. त्यामुळे मी खूप आनंदी आहे.’ मालिकेत चेंडू निर्भयपणे फटकेबाजी केली त्यावर वैभव म्हणाला की, ‘माझा खेळ तसाच आहे जसा मी टी-20 क्रिकेटमध्ये खेळतो. मी फक्त संघासाठी तेच करण्याचा प्रयत्न करत होतो. तिन्ही सामन्यांमध्ये संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. जर मला चांगली सुरुवात मिळाली, तर मला डाव मोठा करायचा होता. हाच माझा एकमेव दृष्टिकोन होता.’
फलंदाजीला उतरताना डोक्यात काय सुरू असतं, यावर वैभव म्हणाला की, ‘मी जे फटके खेळतो, तेच मी सरावातही खेळतो. मी सरावात जे काही करतो, तेच सामन्यात करण्याचा प्रयत्न करतो.’ मालिकावीराचा पुरस्कार मिळाल्याने कसं वाटतं? यावर आनंद व्यक्त करत वैभव म्हणाला की, ‘खरोखरच एक स्वप्न सत्यात उतरल्याचा क्षण आहे. माझे पहिले ‘सामनावीर’ आणि ‘मालिकावीर’ पुरस्कार मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.’