INDA vs SLA : लोकांना ते माहीत नसावे…! वैभव सूर्यवंशीने सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर स्पष्ट केलं
श्रीलंकेत रंगलेल्या ट्राय सीरिज स्पर्धेत भारताने बाजी मारली. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा 66 धावांनी पराभव केल्या. या विजयात वैभव सूर्यवंशीने योगदान दिलं. त्याला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं.

भारत ए आणि श्रीलंका ए संघात ट्राय सीरिज स्पर्धेतील अंतिम सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण वैभव सूर्यवंशीने श्रीलंकन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. वैभव सूर्यवंशी फक्त 11 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्यानंतरही त्याचा झंझावात सुरू राहिला. त्याने 29 चेंडूत 10 चौकार आणि 8 षटकार मारत 94 धावांची खेळी केली. सहान अराचिकेच्या गोलंदाजीवर बाद झाला आणि तंबूत परतला. तिथपर्यंत वैभव सूर्यवंशीने त्याच्या शैलीप्रमाणे आपली भूमिका बजावली होती. वैभव सूर्यवंशीने 324.14 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. त्याच्या झंझावातामुळे टीम इंडियाने श्रीलंकेसमोर विजयासाठी 377 धावांचं आव्हान ठेवलं. तर श्रीलंकन संघ 311 धावांवर बाद झाला आणि भारताने हा सामना 66 धावांनी जिंकला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो वैभव सूर्यवंशी..
वैभव सूर्यवंशीला सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. या पुरस्कारानंतर वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, ‘मी फार विचार केला नाही, फक्त पहिल्या 10 षटकांचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता आणि जे नियोजन केले होते त्याची अंमलबजावणी करायची होती.’ सगळ्यांच्या नजरा तुझ्यावर होत्या म्हणून दडपण होते का? तेव्हा वैभव सूर्यवंशीने सांगितलं की, ‘दडपण नव्हते, पण ज्या योजना यशस्वी होत नव्हत्या, त्या मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होतो. मी प्रशिक्षकांशी बोललो आणि सरावात त्यावर काम केले. आज, योजनेची अंमलबजावणी झाली आणि निकाल आपोआप लागला. मी खूप काही शिकलो, पण मी 50 षटकांचे सामने खूप खेळलो आहे. लोकांना ते माहीत नसावे असे वाटते. वेगवेगळ्या परिस्थिती, वेगवेगळ्या खेळपट्ट्या, खेळायला थोडे वेगळे होते, पण मजा आली आणि ही एक चांगली मालिका होती.’
मालिका विजयानंतर तिलक वर्मानेही आपलं मत व्यक्त केलं. एक संघ म्हणून तुम्ही या स्पर्धेतून काय शिकलात? या प्रश्नावर तिलक वर्मा म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगायचं तर, मला वाटतं की आमची कामगिरी खूपच उत्कृष्ट होती, पण गोलंदाजी थोडी निराशाजनक होती. पण तुम्ही पाहिलं तर, आमच्याकडे खूप चांगला गोलंदाजीचा मारा आहे, पण असं एकेरी मालिकांमध्येच घडतं, मात्र तुम्हाला माहीत आहे की प्रत्येकजण किती प्रतिभावान आहे. त्यामुळे गोलंदाजीत आमची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही, पण शेवटी निकालच महत्त्वाचा असतो. त्यामुळे जेव्हा आम्ही विजयी संघात असतो, तेव्हा ते चांगलंच असतं, पण त्याच वेळी गोलंदाजीतही खूप काही शिकण्यासारखं आहे.’