
वूमन्स टीम इंडियाने अवघ्या काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर आता अवघ्या काही दिवसांनी भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. भारतीय दृष्टीहीन महिला संघाने टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. वूमन्स इंडियाने अंतिम सामन्यात नेपाळचा 7 विकेट्सने धुव्वा उडवत वर्ल्ड कप ट्रॉफी मिळवली. भारतीय संघाने या स्पर्धेत जशी सुरुवात केली होती तसाच शेवटही केला. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहिला. भारताच्या या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंचं अभिनंदन केलं जात आहे.
महाअंतिम सामन्यातील पहिलाच अर्थात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. भारतीय कर्णधाराने नेपाळला बॅटिंगसाठी भाग पाडलं. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजांनी नेपाळला 6 च्या रनरेटनेही धावा करुन दिल्या नाहीत. भारताने नेपाळला 20 ओव्हरमध्ये 5 झटके देत 114 धावांवर रोखलं. नेपाळसाठी सरिता घिमिरे आणि बिमला राय या दोघींनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. सरिताने 35 तर बिमलाने 26 धावांचं योगदान दिलं. या दोघींव्यतिरिक्त एकीलाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियासाठी जमुनी राणी टुडू आणि अनु कुमारी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
त्यानंतर भारताने 115 धावांचं आव्हान सहज पूर्ण करत एकतर्फी विजय मिळवला. भारताने हे आव्हान 47 बॉलआधी आणि 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारताने 12.1 ओव्हरमध्येच विजय साकारला. भारताला विजयी करण्यात फुला सरेन आणि करुणा के या दोघींनी बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. फुलाने 27 बॉलमध्ये नॉट आऊट 44 रन्स केल्या. तर करुणा के हीने 27 चेंडूंमध्ये 42 धावा केल्या. तसेच बसंती हांसदा हीने नाबाद 13 धावा करत भारताला वर्ल्ड कप ट्रॉफीपर्यंत पोहचवण्यात मदत केली.
दरम्यान टीम इंडिया या स्पर्धेत अजिंक्य राहिली. भारताने या स्पर्धेतील एकही क्रिकेट सामना गमावला नाही. या स्पर्धेत एकाही संघाला भारताला पराभूत करता आलं नाही. भारताने श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली होती. त्यानंतर भारताने कांगारुंवर 200 पेक्षा अधिक धावांच्या फरकाने मात केली. भारताने ऑस्ट्रेलियावर 209 धावांनी विजय साकारला.
भारताने ऑस्ट्रेलियानंतर नेपाळवर 85 धावांनी मात केली. अमेरिकेवर भारताने 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला या स्पर्धेतही त्यांची जागा दाखवून दिली.भारताने पाकिस्तानवर 9 विकेट्सने विजय साकारला. त्यानंतर भारतासमोर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं आव्हान होतं. भारताने ऑस्ट्रेलियावर 9 विकेट्सने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक दिली होती.