
टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली. भारताने 7 फेब्रुवारीला यूएसएवर मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 29 धावांनी मात केली. भारताला या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दरम्यान संघर्ष करावा लागला. यूएसएने चांगली झुंज दिली. मात्र टीम इंडियाने आपण गतविजेता आणि टी 20i रँकिंगमधील नंबर 1 का आहोत हे दाखवून दिलं. भारताने 162 धावांचा पाठलाग करणाऱ्या यूएसएला 132 रन्सवर रोखलं. भारताचा हा यूएसए विरुद्धचा सलग आणि एकूण दुसरा विजय ठरला. तसेच टीम इंडियाने या मोहिमेतील पहिल्याच विजयासह इतिहास घडवला. टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
टीम इंडियाने यूएसए संघाला पराभूत करुन ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला झटका दिला. टीम इंडियाने या दोन्ही संघांचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला. इंडिया टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक सलग सामने जिंकणारी पहिली टीम ठरली. यूएसए विरूद्धच्या सामन्याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत सलग सर्वाधिक 8 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड हा संयुक्तरित्या भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. मात्र वानखेडेत विजय मिळवताचा भारताने इतिहास घडवला.
टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 2007 नंतर पहिल्यांदाच टी 20I वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. सूर्यकुमार यादव याने घेतलेल्या ऐतिहासिक कॅचच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात कमालीचं कमबॅक करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं होतं. भारताचा तो टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला होता. भारताने यासह सलग 8 सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिकेची विजयाची मालिका खंडीत केली. तसेच भारत त्या वर्ल्ड कप स्पर्धेत अजिंक्य होती. भारताने त्यानंतर आता तीच कामगिरी यूएसए विरुद्ध सुरु ठेवत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला. तसेच ऑस्ट्रेलियाने 2022 आणि 2024 च्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण आणि सलग 8 सामने जिंकले होते.
दरम्यान टीम इंडिया या मोहिमेतील आपला दुसरा सामना हा 12 फेब्रुवारीला खेळणार आहे. टीम इंडियामसोर या सामन्यात नामिबियाचं आव्हान असणार आहे. हा सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमध्ये होणार आहे.