Jasprit Bumrah : टीम इंडिया आता बुमराहवर विसंबून नाही, माजी फिरकीपटूने स्पष्टच सांगितलं

England vs India 5th Test : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भारताला आतापर्यंत अनेक सामने जिंकून दिले. मात्र बुमराह टीम इंडिया अडचणीच असतानाही इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे 5 पैकी फक्त 3 सामनेच खेळला. त्यामुळे बुमहारबाबत आता नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Jasprit Bumrah : टीम इंडिया आता बुमराहवर विसंबून नाही, माजी फिरकीपटूने स्पष्टच सांगितलं
Jasprit Bumrah and Prasidh Krishna
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 05, 2025 | 11:47 PM

युवा भारतीय संघाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात चित्तथरारक विजय मिळवला. भारताने इंग्लंडवर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. भारताने इंग्लंडसमोर 374 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडला 367 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने यासह या मालिकेतील दुसरा विजय मिळवण्यासह इंग्लंडला मालिका जिंकण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. भारताच्या केनिंग्टन ओव्हलमधील विजयामुळे मालिका 2-2 ने बरोबरीत राहिली.

भारताच्या या विजयानंतर आता वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या विरोधात वातावरण पेटलं आहे. बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे या मालिकेतील 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. त्यामुळे बुमराह विरुद्ध नाराजीचा सूर आहे. तसेच आता कोणत्याही भारतीय खेळाडूला मर्जीनुसार सामन्यात खेळण्याबाबत कोणताही निर्णय घेता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने याबाबत कठोर पाऊल उचललं असल्याची चर्चा आहे. तर दुसर्‍या बाजूला बुमराहबाबत इंग्लंडचा माजी फिरकीपटू माँटी पानेसर याने विधान केलं आहे. टीम इंडिया आता बुमराहवर विसंबून राहिली नसल्याचं पानेसर यांनी म्हटलं आहे.

माँटी पानेसर काय म्हणाले?

बुमराहची फार चर्चा आहे. मात्र आता भारतीय संघ बुमराहवर विसंबून राहिलेला नाही ही सत्य परिस्थिती आहे. “हा भारतीय संघ आता बुमराहवर अवलंबून नाही. बुमराहची चर्चा फार आहे. मात्र भारताकडे आक्रमक गोलंदाजी आहे, ही सत्य परिस्थिती आहे.”, असं पानेसर यांनी म्हटलं.

प्रसिध कृष्णा-मोहम्मद सिराजचं कौतुक

पानेसर यांनी भारतीय गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज या दोघाचं कौतुक केलं. ही जोडी नव्या बॉलने सुरुवात करु शकते, असं पानेसर यांना वाटतं.

“प्रसिध हळुहळु चांगली कामगिरी करत आहे. मला वाटतं की तो सिराजसोबत नव्या बॉलने गोलंदाजी करु शकतो. भारताला आता आकाश दीप-अर्शदीप सिंह यांच्यासारखा फक्त तिसऱ्या गोलंदाजाची गरज आहे. बुमराह एक शानदार गोलंदाज आहे. मात्र भारताने या मालिकेतील दोन्ही सामने त्याच्याशिवाय जिंकले. त्यामुळे टीम इंडिया बुमराहवर अवलंबून नाही असं मला वाटतं”, असं पानेसर यांनी नमूद केलं.