Sunetra Pawar : अजून अजितदादांचं दहावं झालेलं नसताना इतकी घाई कशाला? अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं उत्तर
Sunetra Pawar : अजित पवार यांच्या निधनाला तीन दिवस होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वेगवान हालचाली सुरु आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदासह पक्षाची कमान त्यांच्याहाती देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे खूप घाई करतायत अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उत्तर दिलं आहे.

अजित दादांच्या निधनाला तीनच दिवस झालेले असताना त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी संभाळावी यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. यावर टीका सुद्धा होतेय. इतकी घाई कशाला? त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिल पाटील यांनी उत्तर दिलं आहे. “दुसऱ्या पक्षांनी काय बोलावं? काय बोलू नये? हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना विचार मांडण्याचा स्वातंत्र्य आहे. अजित पवारांचं जाणं हे न विसरता येणारं दु:ख आहे. ही पोकळी कधीही भरुन येणार नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सैरावैरा झालेत” याकडे अनिल पाटील यांनी लक्ष वेधलं. “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादांनी उमेदवाऱ्या दिल्या होत्या. उमेदवार, कार्यकर्ते दिशाहीन झाले होते. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रत्येक नेत्याची हीच भावना होती की, सुनेत्रा वहिनींनी जबाबदारी संभाळली पाहिजे” असं अनिल पाटील म्हणाले.
“घाई झाली असं अनेकांना वाटत असलं तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ते काम पुढे होणं गरजेचं आहे. घाई करण्याचं कारण असं की जी घटना घडली ती न भरून निघणारी आहे. याच निवडणुकीमुळे दादांचा अपघात झाला. त्यामुळे कार्यकर्ते संघटीत होणे काळाची गरज आहे” असं अनिल पाटील म्हणाले. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधी मला कल्पना दिलेली नाही असं शरद पवार म्हणाले. “त्यांना कल्पना दिलेली असेल किंवा नसेल या विषयावर मी आता काही बोलू शकत नाही. यावर आता चर्चा करण्यात अर्थ नाही” असं उत्तर अनिल पाटील यांनी दिलं.
आमदारांच्या भावना नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या
सुनेत्रा पवार यांच्या निवडीसाठी जी घाई होतेय, त्या ट्रोलिंगवर अनिल पाटील म्हणाले की, “या गोष्टी घाईच्या वाटत असतील अजून 10 व झालं नाहीय, तीन दिवसांचा दुखवटा पूर्ण झालाय. पण काळाची गरज म्हणा. नेता निवडणं आवश्यक आहे, ते काम राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार करु शकतात. राष्ट्रवादीच्या आमदारांच्या भावना नेत्यांनी तातडीने लक्षात घेतल्या. त्यामुळे हा निर्णय घेणं भाग पडतय”
