
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारत आणि अमेरिका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताने जिंकला आणि कर्णधार आयुष म्हात्रेने प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं. हा निर्णय योग्यच ठरला असंच म्हणावं लागेल. भारताने या सामन्यात भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं. 35.2 षटकात अमेरिकेचे सर्व गडी बाद केले आणि त्यांना 107 धावांवर रोखलं. भारतासमोर विजयासाठी 108 धावांचं आव्हान ठेवलं. भारताने हे आव्हान गाठताना 4 षटकात 21 धावांपर्यंत मजल मारली आणि 1 विकेट गमावली. वैभव सूर्यवंशी फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली आणि सामना थांबवावा लागला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा खेळ 37 षटकांचा करण्यात आणि भारताला 96 धावांचं सुधारित टार्गेट देण्यात आलं. हे टार्गेट भारताने 4 गडी गमवून पूर्ण केलं आणि स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली.
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील या सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काही चांगली झाली नाही. सुधारित टार्गेट देण्यापूर्वी वैभव सूर्यवंशीची विकेट पडली होती. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि वेदांत त्रिवेदी मैदानात उतरले. पण वेदांत त्रिवेदीही फक्त 2 धावा करून बाद झाला. त्यानंतर आयुष म्हात्रे 19 धावांवर तंबूत परतला. तेव्हा भारताची धावसंख्या फक्त 25 इतकी होती. त्यामुळे टीम इंडियावर काही अंशी दबाव वाढला होता. विहान मल्होत्रा 18 धावा करून बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या 70 झाली होती. तिथपर्यंत बऱ्यापैकी डाव सावरला होता. अभिज्ञाने कुंदूने सावधघ आणि चांगली फलंदाजी केली. त्याला कनिष्ख चौहानची साथ मिळाली. या जोडीने नाबाद 26 धावांची भागीदारी केली आणि विजय मिळवून दिला.
भारताकडून हेनिल पटेलने सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने 7 षटकं टाकली आणि 16 धावा देत 5 गडी बाद केले. त्याने अमेरिकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. तर दीपेश देवेंद्रन, आरएस अंब्रिश, खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी एक विकेट बाद केला. अमेरिकेकडून नितीश सुदीनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. या व्यतिरिक्त अमेरिकेचा एकही फलंदाज 20 धावा गाठू शकला नाही. दोघांना आपलं खातंही खोलता आलं नाही. तर चार जण एकेरी आकड्यावर तंबूत परतले.