
अंडर 19 आशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामना आता संपले असून उपांत्य फेरीतील चारही संघांची नावे निश्चित झाली आहेत. भारताना साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकत उपांत्य फेरीचं स्थान गाठलं आहे. भारताने पहिल्या सामन्यात युएईला, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला आणि तिसऱ्या सामन्यात मलेशियाला पराभवाची धूळ चारली. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि श्रीलंका यांनी उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत होईल का? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. भारत पाकिस्तान सामना उपांत्य फेरीत होणार नाही. कारण दोन्ही संघ एकाच गटात होते. त्यामुळे उपांत्य फेरीत भारताचा सामना दुसऱ्या गटातील दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल. तर पाकिस्तानचा सामना दुसऱ्या गटातील पहिल्या स्थानावर असलेल्या संघाशी होईल.
उपांत्य फेरीत भारत आणि श्रीलंका , तर पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या उपांत्य फेरीत आमनेसामने आले नसले तरी, अंतिम फेरीत भिडू शकतात. यासाठी भारताला श्रीलंकेला आणि पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत करणं आवश्यक आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 19 डिसेंबरला होणार आहेत. तर अंतिम फेरीचा सामना 21 डिसेंबरला होणार आहे. भारत जेतेपदापासून दोन विजय दूर आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. वैभव सूर्यवंशी फॉर्मात आहे. तर अभिज्ञान कुंडूने द्विशतकी खेळी करून आपला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेत मजबूत स्थितीत आहे.
अ गटात भारताने तीन पैकी तीन सामने जिंकले असून 6 गुणांसह नेट रनरेट +4.260 आहे. तर पाकिस्तानने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुणांसह नेट रनरेट हा +1.847 आहे. ब गटात बांगलादेशने साखळी फेरीत तीन पैकी तीन सामने जिंकले असून 6 गुणांसह नेट रनरेट हा +1.214 आहे. तर श्रीलंकेने तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला असून 4 गुण आहेत. तर नेट रनरेट +0.836 आहे. दुसरीकडे या स्पर्धेतून अफगाणिस्तान, नेपाळ, युएई आणि मलेशिया यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.