Cricket : आशिया कप फायनलमधील हिरो तिलक वर्माला कॅप्टन्सी, रोहितचा समावेश, पहिला सामना केव्हा?

Tilak Varma Captaincy : भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याची 3 सामन्यांसाठी कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जाणून घ्या सविस्तर.

Cricket : आशिया कप फायनलमधील हिरो तिलक वर्माला कॅप्टन्सी, रोहितचा समावेश, पहिला सामना केव्हा?
Tilak Varma Team India
Image Credit source: @TilakV9 X Account
| Updated on: Oct 10, 2025 | 6:58 PM

टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्मा याने अवघ्या काही दिवसांपूर्वी आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाकिस्तान विरुद्ध झुंजार खेळी केली. तिलकने टीम इंडिया अडचणीत असताना चिवट खेळी करत आशिया कप जिंकून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. त्यानंतर आता तिलक वर्माला गूड न्यूज मिळाली आहे. तिलकची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. हैदराबाद क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती दिली आहे.

टीम इंडिया मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दरम्यान भारतात रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. रणजी ट्रॉफीसाठी काही तासांपूर्वी हैदराबाद क्रिकेट बोर्डाने संघ जाहीर केला. हैदराबादने पहिल्या 3 सामन्यांसाठी हा संघ जाहीर केलाय.

पहिल्या 3 सामन्यांसाठी हैदराबाद क्रिकेट टीम

हैदराबादने मुख्य संघात 15 खेळाडूंची निवड केली आहे. तर राखीव म्हणून 5 खेळाडूंना संधी दिली आहे. तिलक वर्मा हैदराबादचं नेतृत्व करणार आहे. तर राहुल सिंह याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तिलक वर्माच्या नेतृत्वात रोहित रायडु खेळणार आहे. तसेच निवड समितीने अनेक युवा खेळाडूंनाही या स्पर्धेसाठी संधी दिली आहे.

हैदराबादसमोर कुणाचं आव्हान?

हैदराबाद या स्पर्धेत आपल्या पहिल्या 3 सामन्यांमध्ये दिल्ली, पुड्डेचरी आणि हिमाचल प्रदेश विरुद्ध भिडणार आहे. तिलक वर्मा याच्या नेतृत्वात हैदराबाद टीम कशी कामगिरी करते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

तिलक वर्माची फर्स्ट क्लास कामगिरी

दरम्यान तिलक वर्मा याने आतापर्यंत 22 फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. तिलकने या 22 सामन्यांमध्ये 52 पेक्षा अधिकच्या सरासरीने 1 हजार 562 धावा केल्या आहेत. तिलकने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 7 शतकं आणि 5 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच तिलकने 8 विकेट्सही घेतल्या आहेत.

रणजी ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी हैदराबाद टीम : तिलक वर्मा (कर्णधार), राहुल सिंह (उपकर्णधार), सीवी मिलिंद, तनमय अग्रवाल, एम अभिरथ रेड्डी, हिमतेजा, वरुण गौड, तनय त्यागराजन, रोहित रायडू, सरनु निशांत, पुन्नैया, अनिकेत रेड्डी, कार्तिकेय काक, अली काची डायमंड (विकेटकीपर) आणि राहुल रादेश (विकेटकीपर).

राखीव खेळाडू: पी. नितीश रेड्डी, साई प्रज्ञय रेड्डी, रक्षन्न रेड्डी, नितेश कनाला आणि मिखिल जैस्वाल.