संकटमोचक…! तिलक वर्माने पाकिस्ताननंतर दिला कांगारूंना दणका, असं काढलं संकटातून बाहेर
भारतासाठी पुन्हा एकदा तिलक वर्मा संकटमोचक ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली होती. संपूर्ण संघ फक्त 246 धावांवर बाद झाला. पण एका बाजूने तिलक वर्माने खिंड लढवली आणि भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं.

भारत ए आणि ऑस्ट्रेलिया ए यांच्यात दुसरा वनडे सामना होत आहे. या सामन्यात भारताची फलंदाजी काही खास झाली नाही. भारत ए संघाची सुरुवात खराब झाली. भारताने फक्त 17 धावांत तीन विकेट गमावल्या. पण तिलक वर्मा एका बाजूने उभा राहिला आणि संघाच्या धावा 200 पार नेण्यास मदत केली. त्याने आपल्या खेळीत एकूण 9 चौकार आणि षटकार मारले. तिलक वर्मा आणि रियान पराग वगळता इतर फलंदाजांनी नांगी टाकली. तळाच्या हार्षित राणा आणि रवि बिश्नोई यांनी काही धावांची भर घातली म्हणून टीम इंडियाला 246 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताने 45.5 षटकात सर्व गडी गमवून 246 धावा केल्या आणि विजयासाठी 247 धावांचं आव्हान दिलं आहे. या 246 धावात तिलक वर्माचं योगदान 94 धावांचं आहे. त्याने 122 चेंडूंचा सामना करत 5 चौकार 4 षटकार मारत 94 धावांची खेळी केली. त्याचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. पण त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
अष्टपैलू रियान पराग आणि तिलक वर्माने चौथ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली. रियान परागने 54 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 58 धावा केल्या. दुसरीकडे तिलक वर्माचं शतक अवघ्या 6 धावांनी हुकलं. जॅक एडवर्डच्या गोलंदाजीवर फटका मारताना कूपर कोन्नोलीच्या हाती झेल देत बाद झाला. पण तिलक वर्मा शेवटपर्यंत उभा राहिला होता. त्याची विकेट मिळत नाही तोपर्यंत कांगारूचे गोलंदाज अस्वस्थ झाले होते. अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर तिलक वर्मा उतरला होता. त्याने उर्वरित सर्व फलंदाजांसोबत भागीदारी केली. रवि बिश्नोईने 30 चेंडूत 26 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. हर्षित राणाने 13 चेंडूत 21 धावा केल्या. यात एक चौकार आणि दोन षटकार होते.
ऑस्ट्रेलिया ए संघाकडून कर्णधार जॅक एडवर्डने भेदक गोलंदाजी केली. त्याने 8.5 षटकात 56 धावा देत 4 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, निशांत सिधू आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट काढल्या. तर तनवीर सांगा आणि विल सदरलँड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. लाचलेन हीमे आणि मॅकेन्झी हार्वे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली होती. आता दुसरा सामना कांगारूंना जिंकणं भाग आहे. अन्यथा ही मालिका दुसऱ्याच सामन्यात भारताच्या खिशात जाईल.
