
टीम इंडिया टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील चॅम्पियन ठरली. स्पर्धेच्या 41 वर्षांच्या इतिहासात महाअंतिम सामन्यात हे 2 शेजारी देश पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. या सामन्याचं आयोजन हे रविवारी 28 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. भारताने या महाअंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात केली. पाकिस्तानने भारतासमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान तिलक वर्मा याच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 5 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील एकूण सातवा तर पाकिस्तान विरुद्धचा तिसरा विजय ठरला. भारताने यासह एकूण नवव्यांदा आशिया चॅम्पियन होण्याची कामगिरी केली.भारताने अंतिम फेरीतील विजयानंतर एसीसी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरुन आता चांगलीच चर्चा पाहायला मिळाली.
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे. शिंदेंनी एक्स पोस्ट करत भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.
एकनाथ शिंदेंची टीम इंडियासाठी पोस्ट
भारत माता की जय…
हिंदुस्थान हाच आशिया चषकाचा हीरो…
पाकिस्तानी क्रिकेट संघाचा उडवला धुव्वा…
प्रथम गोलंदाजी करताना कुलदीप यादवने घेतलेल्या ४ महत्वपूर्ण विकेट आणि त्याला जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी यांनी दिलेली साथ या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने… pic.twitter.com/OWEhvp9ugA
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 28, 2025
टीम इंडियाचा युवा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याला मॅन ऑफ द सीरिज या पुरस्काराने गौरवण्यात आलं. अभिषेकची आशिया कप स्पर्धेत खेळण्याची पहिलीच वेळ होती. अभिषेकने या पहिल्याच फेरीत ऐतिहासिक कामगिगरी केली. अभिषेकने 7 सामन्यांमध्ये 300 पेक्षा अधिक धावा केल्या. अभिषेक यासह बहुराष्ट्रीय टी 20i स्पर्धेत सर्वाधिक करणारा फलंदाज ठरला.
टीम इंडियाने पाकिस्तानवर आशिया कप स्पर्धेतील अंतिम फेरीत विजय 5 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाला या विजयानंतर एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येणार होती. त्यामुळे टीम इंडियाने नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यामुळे नक्वी आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा जगासमोर नाचक्की झाली.
रिंकु सिंह म्हणाला की, ‘बाकी काही महत्त्वाचे नाही. हा एक चेंडू महत्त्वाचा आहे. एक चेंडू हवा होता. मी चौकार मारला. सर्वांना माहिती आहे की मी फिनिशर आहे. संघ जिंकला आणि मी खरोखर आनंदी आहे.’
भारताने आशिया कप स्पर्धेचं जेतेपद नवव्यांदा मिळवला. आशिया कप 2025 स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. तसेच पाकिस्तानला 3-0 ने मात दिली. अंतिम सामना अतितटीचा झाला. पण शेवटच्या षटकात विजयश्री खेचून आणला.
भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा चिरडलं आहे. भारताने आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पुन्हा पराभूत केलं. भारताने या सामन्यात तिसऱ्यांदा पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं. पाकिस्तानने विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने 5 गडी गमवून 19.4 षटकात पूर्ण केलं. भारताने महत्त्वाचे 3 विकेट पावरप्लेमध्येच गमावले होते. पण तिलक वर्मा आणि संजू सॅमनस यांनी मधल्या फळीत डाव सावरला. तर शिवम दुबेने तिलक वर्माला शेवटी उत्तम साथ दिली. तिलक वर्माने अंतिम सामन्यात 53 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यात त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शिवम दुबेने 22 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकार मारत 33 धावा केल्या. तिलक वर्माने शेवटपर्यंत उभा राहून सामना जिंकून दिला.
शिवम दुबे 22 चेंडूत 33 धावा करून बाद झाला. भारताला 6 चेंडूत 10 धावांची गरज आहे. रिंकु सिंह मैदानात उतरला आणि स्ट्राईकला तिलक वर्मा आहे.
टीम इंडियाला 12 चेंडूत 17 धावांची गरज आहे. त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत आला आहे. भारताकडे बॅटिंगमध्ये खोली आहे. त्यामुळे हे आव्हान शक्य आहे.
टीम इंडियाचा युवा फलंदाज तिलक वर्मा याने निर्णायक क्षणी अर्धशतक झळकावलं आहे. तिलकने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं. तिलकने अर्धशतकासाठी 41 चेंडूंचा सामना केला. टीम इंडियाला आता शेवटच्या 4 षटकात विजयासाठी आणखी 36 धावांची गरज आहे.
तिलक वर्मा याने 15 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर सिक्स ठोकला. यासह टीम इंडियाने 100 धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाला विजयासाठी 30 बॉलमध्ये विजयासाठी आणखी 47 धावांची गरज आहे. तिलक वर्मा 48 आणि शिवम दुबे 10 धावांवर नाबाद खेळत आहेत.
पाकिस्तानने टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार याने तिलक वर्मा आणि संजू सॅमसन ही सेट जोडी फोडली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली होती. त्यामुळे या दोघांनी असंच खेळत रहावं, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र अबरारच्या बॉलिंगवर संजू मोठा फटका मारण्याच्या नादात कॅच आऊट झाला. संजूने 21 बॉलमध्ये 24 रन्स केल्या.
टीम इंडियाने पावरप्लेमध्ये झटपट 3 विकेट्स गमावल्या. अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल अशा 3 मोठ्या विकेट्स भारताने गमावल्या. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली आहे. त्यामुळे आता 147 धावांचं आव्हान पार करायचं असेल तर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा या जोडीला मोठी भागीदारी करावी लागणार आहे. या जोडीकडून भारताला आशा आहेत.
टीम इंडियाची 147 धावांचा पाठलाग करताना निराशाजनक सुरुवात झाली आहे. भारताने झटपट 2 विकेट्स गमावल्या. ओपनर अभिषेक शर्मा आणि कॅप्टन सूर्यकुमार यादव झटपट आऊट झाल्यानंतर तिलक वर्मा आणि शुबमन गिल या जोडीकडून भारताला आशा होत्या. मात्र शुबमनने या सामन्यातही निराशा केली. शुबमन चौथ्या ओव्हरमधील सहाव्या बॉलवर 12 रन्स करुन कॅच आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 4 ओव्हरनंतर 3 आऊट 20 अशी स्थिती झाली आहे.
भारताला दुसरा धक्का बसला आहे. सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यातही फेल गेला. फक्त 1 धाव करून तंबूत परतला. खरं तर संघाला त्याची गरज होती. मात्र मोक्याच्या क्षणी विकेट गमावली.
भारताला अंतिम सामन्यात मोठा धक्का बसला आहे. सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा फक्त 5 धावा करून बाद झाला.
अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल जोडी मैदानात आहे. अभिषेकने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारत श्री गणेशा केला आहे. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदी आक्रमकपणे गोलंदाजी करताना दिसत आहे.
पाकिस्तानचा संघ 146 धावांवर ऑलआऊट झाला आहे. पाकिस्तानने 19.1 षटकात सर्व गडी गमवून 146 धावा केल्या आणि विजयासाठी 147 धावांचं आव्हान दिलं आहे. आता भारताला हे आव्हान कसं गाठतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. या सामन्यात कुलदीप यादवने पाकिस्तानला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं. कुलदीप यादवने 4 षटकात 30 धावा देत 4 गडी बाद केले. यात तीन गडी तर एकाच षटकात घेतले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानला नववा धक्का दिला आहे. परफेक्ट यॉर्कर टाकत हारिस रऊफला तंबूचा रस्ता दाखवला आहे.
टीम इंडियाचा चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात कमाल केली आहे. कुलदीपने डावातील 17 व्या ओव्हरमध्ये 3 झटके देत पाकिस्तानला बॅकफुटवर टाकलं आहे. कुलदीपने सलमान आघा, शाहिन अफ्रिदी आणि फहीम अश्रफ या तिघांना मैदाना बाहेरचा रस्ता दाखवला.
कमबॅक करावं तर टीम इंडियासारखं. टीम इंडियाची पाकिस्तान विरुद्ध निराशाजनक सुरुवात राहिली. पाकिस्तानच्या सलामी जोडीने 87 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या त्रिकुटाने पाकिस्तानला झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानची 15.3 ओव्हरमध्ये 5 आऊट 131 अशी स्थिती झाली आहे.
पाकिस्तानच्या सलामी जोडीने अप्रतिम सुरुवात करुन टीम इंडियाला बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी कमाल केली. भारतीय गोलंदाजांनी सेट जोडीला फोडल्यानंतर अवघ्या 14 धावांच्या मोबदल्यात 3 झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानचा स्कोअर 14.4 ओव्हरमध्ये 4 आऊट 126 असा झाला आहे.
टीम इंडियाने शतकी सलामी भागीदारी करणाऱ्या पााकिस्तानला दणका देत सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. भारताने पाकिस्तानला 107 धावांवर पहिला झटका देत सेट जोडी फोडली. त्यानंतर टीम इंडियाने 2 ओव्हरमध्ये 2 झटके देत सामन्यात कमबॅक केलं आहे. टीम इंडियाने साहिबजादा फरहान, समॅ अयुब याच्यानंतर मोम्हमद हारीस याला आऊट केलं आहे. हारीसला भोपळाही फोडता आला नाही.
टीम इंडियाने पाकिस्तानला दुसरा झटका दिला आहे. कुलदीप यादव याने पहिली विकेट घेत पाकिस्तानच्या सॅम अयुब याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. जसप्रीत बुमराह याने सुरेख कॅच घेत सॅमला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. सॅमने 14 धावा केल्या.
पाकिस्तान मजबूत स्थितीत पोहचली आहे. पाकिस्तानने 12 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 107 रन्स केल्या आहेत. सॅम अयुब आणि फखर झमान ही जोडी मैदानात खेळत आहे. तर साहिबजादा फरहान 57 धावा करुन माघारी परतला. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात काही प्रमाणात बॅकफुटवर आहे.
वरुण चक्रवर्ती याने पाकिस्तानला पहिला झटका देत टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत असलेली जोडी फोडली आहे. वरुणने नवव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर साहिबजादा फरहान याला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. साहिबजादाने 38 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.
पाकिस्तानच्या सलामी जोडीने पाहता पाहता अर्धशतकी भगीदारी केली. फखर जमान आणि साहिबजादा फरहान या सलामी जोडीने 8 ओव्हरमध्ये 8 च्या रनरेटने 64 धावा केल्या आहेत. फखर जमान 15 आणि साहिबजादा 47 धावांवर नाबाद खेळत आहे.
फखर जमान आणि साहिबजादा फरहान या सलामी जोडीने पावर प्लेमध्ये 7 पेक्षा अधिकच्या रनरेटने धावा केल्या आहेत. सलामी जोडीने 6 ओव्हरमध्ये बिनबाद 45 धावा केल्या आहेत. साहिबजादा 31 आणि फखर 12 धावांवर नाबाद खेळत आहे.
फखर झमान आणि साहिबजादा फरहान या पाकिस्तानच्या सलामी जोडीने आश्वासक सुरुवात केली आहे. या जोडीने 4 ओव्हरमध्ये नाबाद 32 धावांची भागीदारी केली आहे. साहिबजादा फरहान 23 आणि फखर झमान 6 धावांवर नाबाद खेळत आहेत. तर टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान आणि फखर जमान ही जोडी मैदानात उतरली आहे. तर भारताकडून शिवम दुबे पहिलं षटक टाकत आहे.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती
सलमान आगा म्हणाला की, प्रथम फलंदाजी करण्यास निश्चितच आनंद झाला. आम्ही खूप उत्साहित आहोत आणि या सामन्यासाठी उत्सुक आहोत. आम्ही अद्याप परिपूर्ण सामना खेळलेला नाही आणि आशा आहे की आम्ही आज चांगलं खेळू. तोच संघ. आम्ही काही काळापासून या खेळपट्ट्यांवर खेळत आहोत. तसंच खेळू.
सूर्यकुमार यादव म्हणाला की ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत आहोत. ही चांगली खेळपट्टी दिसते. प्रकाशात खेळपट्टी चांगली होते. आम्ही सुरुवातीला चांगली फलंदाजी करत होतो पण आज आम्हाला पाठलाग करायला आवडेल. येथील मैदानातील खेळाडूंनी विकेटसह उत्तम कामगिरी केली आहे आणि ती तशीच राहील. गेल्या पाच सहा सामन्यांपासून आम्ही ज्या पद्धतीने खेळत आहोत ते खूपच चांगले आहे आणि आम्हाला ते पुढे चालू ठेवायचे आहे. दुर्दैवाने हार्दिक दुखापतीमुळे खेळणार नाही. बुमराह, दुबे आणि रिंकू आले आहेत.
नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला असून प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारत प्रथम गोलंदाजी करणार असून संघात तीन बदल केले आहेत. हार्दिक पांड्याच्या जागी रिंकु सिंगची निवड केली आहे. तर जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबेचं कमबॅक झालं आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठीची चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. सामन्याला कधी सुरुवात होतेय असं चाहत्यांना झालंय. तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला मिळणार? याकडेही चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आता थोड्याच मिनिटांमध्ये मिळणार आहेत.
अंतिम सामन्यासाठी सर्व तयारी झाली आहे. दोन्ही संघ थोड्याच वेळात मैदानात उतरणार आहेत. सामन्याला 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. स्टेडियममध्ये चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थितीती लावली आहे.
“सूर्यकुमारला यातून बाहेर पडण्याची गरज आहे. गेल्या सामन्यातही आम्ही चर्चा केली होती की, जेव्हा तुम्ही फॉर्ममध्ये नसता तेव्हा शक्य तितके सरळ खेळण्याचा प्रयत्न करावा. विशेषतः वेगवान गोलंदाजांविरुद्ध, पण आज एका फिरकी गोलंदाजाविरुद्ध स्वीप खेळताना त्याला यश मिळाले. जर तो फॉर्ममध्ये आला तर हा संघ अधिक मजबूत होईल,” असे निरीक्षण इरफान पठाणने नोंदवले.
भारत-पाकिस्तान सामन्याला आता मोजून काही मिनिटं बाकी आहेत. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी साडे सात वाजता टॉस होणार आहे. टॉसला आता 1 तासापेक्षा कमी कालावधी बाकी आहे. दुबईत टॉस जिंकून फिल्डिंग करणं फायदेशीर असल्याचं ट्रॅक रेकॉर्डवरुन स्पष्ट होतं. त्यामुळे टॉस जिंकून फिल्डिंग घेण्याचा निर्णय योग्य ठरु शकतो.
“मी चष्मा लावूनही हे सांगेन! जरी तुम्ही मला गाढ झोपेतून उठवले तरी माझे उत्तर बदलणार नाही. अर्शदीपने खेळायलाच हवं. आठव्या क्रमांकाचा फलंदाज किती धावा करेल? खूप जास्त नाही, आणि तुम्हाला इतक्या धावांची गरज नाही. सहा महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी अर्शदीपच्या बॅटिंगवर काम करा. वरुण चक्रवर्तीच्या बॅटिंगवर काम करा. बुमराह फटकेबाजी करू शकतो. बॅटिंग कोचने या खेळाडूंना अधिक वेळ देण्याची गरज आहे,” असं अश्विन त्याच्या ‘अॅश की बात’ या यूट्यूब चॅनलवर म्हणाला.
रविवारी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताविरुद्ध होणाऱ्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानी राजकारणी फिरदौस आशिक अवान यांनी पाकिस्तानी फलंदाज सैम अयुबला कडक इशारा दिला आहे. “सैम अयुब, तुझ्यात खूप क्षमता आहे. हिवाळा नाही की तू इथे अंडी खाण्यासाठी आला आहेस. तुझ्यात प्रतिभा दाखवून दे आणि नैसर्गिक खेळ खेळ. जे शॉट्स खेळून तू आऊट होत आहेस. ते तुझा स्टँडर्ड नाही”, असं फिरदौस आशिक अवान यांनी म्हटलं
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये महाअंतिम सामना होणार आहे. हा सामना पाहायला येणाऱ्या चाहत्यांसाठी नियमावली जारी केली आहे.
“शाहीन हा नक्कीच एक आक्रमक गोलंदाज आहे, जो तुम्हाला हरवण्याचा प्रयत्न करेल. पण अभिषेकही मागे हटणार नाही. या लढाईचा आनंद घेऊया.”, असं मोर्ने मॉर्केल म्हणाला.
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघा म्हणाला की, “पाकिस्तान आणि भारत जेव्हा एकमेकांशी खेळतात तेव्हा त्यांच्यावर नेहमीच खूप दबाव असतो आणि जर आपण असे म्हणतो की कोणताही दबाव नाही, तर ते चुकीचे आहे”
सुपर 4 मधील खेळपट्टीप्रमाणेच खेळपट्टी वापरली जाईल. त्यावेळी पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या होत्या. भारताने 172 धावांचा पाठलाग केला होता. त्यामुळे नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीला प्राधान्य दिलं जाईल. नाणेफेक जिंकणं खूप महत्त्वाचं असणार आहे.
पाकिस्तानने आशिया कप 2025 स्पर्धेतील 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 2 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. टीम इंडियानेच दोन्ही वेळा पाकिस्तानला पराभूत केलंय. पाकिस्तानची या हंगामातील आतापर्यंतची सामनेनिहाय कामगिरी
टीम इंडिया आशिया कप 2025 स्पर्धेत अजिंक्य आहे. टीम इंडियाने साखळी आणि सुपर 4 फेरीतील एकूण 6 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने कोणत्या संघाला किती धावांनी पराभूत केलंय? हे जाणून घेऊयात
श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर भारतीय गोलंदाजीचे प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी पुष्टी केली की, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि फलंदाज अभिषेक शर्मा यांना क्रॅम्पिंगमुळे मैदानाबाहेर ठेवण्यात आले होते. मॉर्केल म्हणाले की, दुबईमध्ये आज पुन्हा एकदा उष्णतेचे वातावरण असल्याने तो भूमिका बजावण्यासाठी पूर्णपणे बरा झाला आहे की नाही हे पाहणे बाकी आहे.
आशिया कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माच्या रडारवर तीन विक्रम आहेत. अभिषेक पाकिस्तान विरुद्ध 11 धावा करताच विराट कोहलीचा बहुराष्ट्रीय टी20 स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम मोडेल. तसेच अभिषेकला 23 धावा करुन फिल साल्ट याचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. अभिषेक कसोटी खेळणाऱ्या टी20 संघांमध्ये एका स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. तसेच अभिषेकने 30 हून अधिक धावा केल्यास तो सलग आठ वेळा अशी कामगिरी करणारा फलंदाज ठरेल. तसेच रोहित शर्मा आणि मोहम्मद रिझवानचा विक्रम मोडेल.
अभिषेक शर्माने आशिया कप 2025 स्पर्धेत सहा सामन्यांत 309 धावा केल्या आहेत. त्यानंतर तिलक वर्मा यांचा समावेश आहे. त्याने 144 धावा केल्या आहेत. यावरून अभिषेकवर संघ अवलंबून असल्याचं दिसून येत आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने अभिषेकला लवकर बाद करण्याचं महत्त्व अधोरेखित केले. ” अभिषेकला लवकर बाद करण्याची आवश्यकता आहे,” असं वसीम अक्रम पीटीआयसोबत बोलताना म्हणाला.
पाकिस्तानचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कमी तळ्यातमळ्यात राहिला आहे. भारताविरुद्ध सामन्यात तर नांगी टाकली आहे. असं असलं तरी पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन आशावादी आहेत. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर त्यांनी सांगितले की, “अंतिम सामना हा एकमेव सामना आहे जो महत्त्वाचा आहे.
अभिषेक शर्मा, हार्दिक पंड्या आणि तिलक वर्मा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाले होते. तसेच बराच वेळ मैदानाबाहेर होते. अभिषेक आणि तिलक तंदुरुस्त असण्याची अपेक्षा आहे. हार्दिकच्या स्थितीबाबत अनिश्चितता आहे. नाणेफेकीआधी त्याच्याबाबत निर्णय घेतला जाण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि पाकिस्तान 13व्यांदा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर येणार आहेत. मागील 12 पैकी आठ स्पर्धा पाकिस्तानने जिंकल्या आहेत, तर चार भारताने जिंकल्या आहेत.
टीम इंडियाने पाकिस्तानला आशिया कप 2025 स्पर्धेत गेल्या 14 दिवसात 2 वेळा पराभूत केलं आहे. टीम इंडियाने 14 सप्टेंबरला साखळी फेरीत पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर टीम इंडियाने सुपर 4 फेरीत पाकिस्तानवर 7 चेंडू आणि 6 विकेट्स राखून विजय मिळवला होता.
भारत आणि पाकिस्तानने आतापर्यंत 15 टी20 सामने खेळले आहेत. भारताने यापैकी 12 सामने जिंकले आहेत. यात ऐतिहासिक बॉल-आउट विजयाचा समावेश आहे. पाकिस्तानने फक्त तीन वेळा भारताला हरवले आहे.
ठाकरे शिवसेनेच्या निषेधानंतर पीव्हीआरने भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025 स्पर्धेतील महाअंतिम सामन्याचं स्क्रीनिंग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातील आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईतील पीव्हीआर सिनेमामध्ये दाखवण्यात येणार होता. मात्र ठाकरे गटाने इंगा दाखवल्यानंतर पीव्हीआर प्रशासनाने हा निर्णय बदलला आहे.
पाकिस्तान टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तान बांगलादेश विरूद्धच्या प्लेइंग ईलेव्हनसह मैदानात उतरु शकते.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ आणि अबरार अहमद.
टीम इंडिया अंतिम फेरीसाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 2 बदल करु शकते. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या दोघांचं कमबॅक होणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांना बाहेर बसावं लागू शकतं
भारतीय संघात अंतिम फेरीसाठी या 11 खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, संजू सॅमसन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह.
पाकिस्तानसमोर महाअंतिम सामन्यात टीम इंडियाचा युवा आणि सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याला रोखण्याचं आव्हान असणार आहे. अभिषेकने या हंगामात 300 पेक्षा अधिक धावा करण्यासह गेल्या 3 सामन्यांमध्ये सलग 3 अर्धशतकं केली आहेत. त्यामुळे पाकिस्तान अभिषेक शर्मा याला रोखण्यात यशस्वी ठरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाने टी 20i क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. उभयसंघात एकूण 15 वेळा आमनासामना झाला आहे. भारताने 15 पैकी 12 टी 20i सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आहे. तर पाकिस्तानला केवळ 3 वेळाच विजयी होता आलंय.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान महाअंतिम सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. भारत-पाकिस्तान लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपद्वारे पाहता येईल. तर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्स सामना पाहायला मिळेल.
टी 20i आशिया कप 2025 स्पर्धेत अंतिम सामन्यानिमित्ताने भारत विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने येण्याची महिन्याभरातील तिसरी वेळ ठरली आहे. याआधी दोन्ही संघ 14 आणि 21 सप्टेंबरला आमनेसामने आले होते. भारताने या दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानवर मात केली होती. त्यामुळे टीम इंडिया पाकिस्तानवर मात करत विजयी हॅटट्रिक करण्यासह सलग दुसऱ्यांदा आशिया कपवर नाव कोरणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
साहिबजादा फरहान, फखर जमान, सॅम अयुब, सलमान आघा (कॅप्टन), हुसैन तलत, मोहम्मद हरिस (विकेटकीपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद, हसन अली, खुशदिल शाह, मोहम्मद वसीम जूनियर, सलमान मिर्झा, हसन नवाज आणि सुफियान मुकीम.
भारतीय संघ : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रिंकू सिंह आणि जितेश शर्मा.
टीम इंडिया आशिया कप 2025 ट्रॉफी जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियासमोर अंतिम सामन्यात पाकिस्तानचं आव्हान आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सलमान आघा याच्याकडे पाकिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.