Asia Cup 2025 स्पर्धेची तारीख फिक्स! रोहित-विराटला इच्छा असूनही खेळता येणार नाही

Asia Cup 2025 Venue India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर दोन्ही देशात क्रिकेट सामने होणार की नाही? असा प्रश्ना क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात होता.मात्र आता आशिया कप 2025 स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

Asia Cup 2025 स्पर्धेची तारीख फिक्स! रोहित-विराटला इच्छा असूनही खेळता येणार नाही
Team India Asia Cup Winner
Image Credit source: Getty Images
| Updated on: Jun 29, 2025 | 3:59 PM

भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर कारवाई करत पहलगाम दहशतवादी हल्ल्याची अचूक परतफेड केली. सैन्य दलाने या कारवाईसह पाकिस्तानची खोड मोडली. यामुळे दोन्ही देशात संघर्ष पाहायला मिळाला. भारताने या हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतचे बहुतांश व्यवहार बंद केले. त्याचा परिणाम क्रीडा विश्वावरही पाहायला मिळत आहे. दोन्ही देशातील तणावामुळे बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेच्या आयोजनावर टांगती तलवार आहे. मात्र आता या स्पर्धेच्या आयोजनासाठी एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट समिती सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप 2025 स्पर्धेला 10 सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते.

आशिया कप 2025 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 2026 मध्ये खेळवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आशिया कप स्पर्धाही टी 20 फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी भारत-पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या संमतीने उभयसंघातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतील, असं ठरलेलं. त्यानुसार पाकिस्तानकडे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यजमानपदाचा मान असूनही भारताचे सर्व सामने हे यूएईत खेळवण्यात आले होते. तर आता भारताकडे आशिया कप 2025 चं यजमानपद आहे. त्यामुळे संपूर्ण स्पर्धाच हायब्रिड पद्धतीने खेळवावी लागेल किंवा दुसऱ्या देशात आयोजन करावं लागू शकतं,  असे 2 पर्याय होते. मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर या दोन्ही शक्यताही धुसर झाल्या आहेत.

10 सप्टेंबरपासून यूएईमध्ये आयोजन!

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, स्पर्धेचं आयोजन होईल, अशी आशा एसीसीला आहे. रिपोर्ट्सनुसार, 10 सप्टेंबरपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होऊ शकते. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि यूएई हे 6 संघ सहभागी होणार आहेत. मात्र याबाबतचा निर्णय हा जुलैमधील पहिल्या आठवड्यात होईल. तसेच या दरम्यानच स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होईल, असं म्हटलं जात आहे.

तसेच स्पर्धेतील सामने हे यूएईमध्ये होऊ शकतात. आशिया कप 2023 स्पर्धेचं आयोजन हायब्रिड मॉडेलनुसार करण्यात आलं होतं. तेव्हा पाकिस्तानकडे स्पर्धेचं यजमानपद होतं. त्यामुळे भारताने सर्व सामने हे श्रीलंकेत खेळले होते.

आयसीसीमुळे आशा वाढीस

दरम्यान भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे भविष्यात शेजारी देशातील क्रिकेट संघात सामने होणार नाहीत, अशी दाट शक्यता होती. मात्र आयसीसीने काही दिवसांपूर्वी आगामी वूमन्स टी 20 आणि वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं. भारत-पाकिस्तान महिला क्रिकेट संघ आयसीसीच्या या दोन्ही स्पर्धेत आमनेसामने येणार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धाही होणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

रोहित-विराटला खेळता येणार नाही

दरम्यान आशिया कप 2025 स्पर्धा टी 20i फॉर्मेटनुसार खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत इच्छा असूनही रोहित शर्मा आणि विराट कोहली या माजी कर्णधारांना खेळता येणार नाही. या दोघांनी टी 20i फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे.