बीसीसीआयकडून टीम इंडियावर पैशांचा वर्षाव, तीन कामगिरी फत्ते केल्याने मिळाले 204 कोटी रुपये
आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. या विजयानंतर भारतीय खेळाडूंच्या हाती काही ट्रॉफी आली नाही. पण भारतीय खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. आतापर्यंत 204 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.

आशिया कप स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली. एकही सामना न गमवता जेतेपदावर नाव कोरलं. भारताच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. खासकरून भारताने पाकिस्तानला 3-0 ने मात दिली. अंतिम फेरीत पाकिस्तानला 5 गडी राखून पराभूत केलं. टीम इंडियासाठी आशिया कप 2025 स्पर्धेतील विजय खास होता.कारण पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारताने पार पाडलेलं ऑपरेशन सिंदूरनंतर भारत पाकिस्तान सामना खेळण्याची पहिली वेळ होती. त्यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींची चीड होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानी संघाला सोडायचा नाही हा भाव होता. भारतीय खेळाडूंनी कामगिरी देखील तशीच केली. टीम इंडियाने पाकिस्तानला अपेक्षेप्रमाणे धोबीपछाड दिला. त्यामुळे भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाने सलग तिसऱ्यांदा मल्टी टीम स्पर्धेत आपली विजयी पताका फडकावली आहे.
भारताने मागच्या 15 महिन्यात तीन मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. टी20 वर्ल्डकप 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि आता आशिया कप 2025 स्पर्धा जिंकली. या सर्व स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. या स्पर्धेत भारताने एक हाती विजय मिळवला आहे. त्यामुळे बीसीसीआयने भारतीय खेळाडूंवर बक्षिसाचा वर्षाव केला आहे. आशिया कप विजयानंतर बीसीसीआयने भारतीय संघाला 21 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. यापूर्वी देखील दोन स्पर्धांसाठी कोट्यवधींचं बक्षीस दिलं होतं.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात न्यूझीलंडला अंतिम फेरीत धोबीपछाड दिला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा विजय मिळवला होता. या विजयानंतर बीसीसीआयने खेळाडूंसह कोचिंग स्टाफ आणि स्पर्धेशी निगडीत सर्व सदस्यांना 58 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. चॅम्पियन्स ट्रॉफीतही भारताने एकही सामना गमावला नव्हता आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं.
टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेतही भारताने जेतेपदावर नाव कोरलं होतं. अंतिम सामन्यात साउथ अफ्रिकेला 7 धावांनी मात दिली होती. तसेच 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप जिंकला होता. तेव्हा बीसीसीआयने 125 कोटींचं बक्षीस जाहीर केलं होतं. त्यामुळे या तीन स्पर्धांमधून भारतीय संघाला एकूण 204 कोटी रुपयांचं बक्षीस मिळालं आहे.
