IND vs WI: वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्माबाबत मोठा निर्णय
वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे आणि टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. वनडे मालिकेत रोहित शर्माच्या निवडीबाबत पेच होता. त्यामुळे या संघात आहे की नाही? याबाबत चर्चा होती. अखेर हा प्रश्न सुटला असून त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेस्ट इंडिजविरुद्ध आगामी घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी अधिकृतपणे भारतीय संघाची घोषणा केली आहे. 27 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी शुबमन गिलकडे कर्णधारपद आहे, तर स्टार फलंदाज श्रेयस अय्यर हा टी20 संघाचे नेतृत्व करताना दिसेल. रोहित शर्मा वनडे मालिकेत खेळणार की नाही? याबाबत चाहत्यांमध्ये सर्वात मोठी उत्सुकता होती. कारण त्याच्या निवडीबाबत बराच पेच निर्माण झाला होता. 2027 वनडे वर्ल्डकप संघाच्या बांधणीत बसत नसल्याचं बोललं जात होतं. पण निवड समितीने रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही ज्येष्ठ खेळाडूंना एकदिवसीय संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे आगामी 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या रणनीतीचा भाग असतील असं जाणकारांचं म्हणणं आहे.
जुलै 2026 मध्ये झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मावर निवृत्तीचा आणि संघातून बाहेर पडण्याचा मोठा दबाव होता. मात्र, त्याने आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम निर्णायक एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने 110 चेंडूंत 138 धावांची झंझावाती खेळी केली. लॉर्ड्सवरील याच शतकामुळे रोहितने आपले स्थान पुन्हा मजबूत केले आणि बीसीसीआयला त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात कायम ठेवणे भाग पडले. दुसरीकडे, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे स्टार खेळाडू या एकदिवसीय मालिकेत नाहीत. त्याला कारणही तसंच आहे. दोन्ही स्टार खेळाडू 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेणार आहे. वनडे मालिकेदरम्यान ही स्पर्धा असल्याने दोघंही वनडे संघाचा भाग नाहीत.
एकदिवसीय संघात ऋषभ पंतच्या निवडीवरही बरीच चर्चा रंगली होती. पण त्याला पुन्हा एकदा वगळण्यात आले आहे. पंतच्या जागेवर राखीव यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड झाली आहे. इराणी चषकासाठी पंतला ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. हार्दिक पांड्याचेही पुनरागमन झालेले नाही, त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबद्दल शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, वनडे संघात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाडचे संघात पुनरागमन झाले आहे.
🚨 News 🚨#TeamIndia ODI & T20I squads announced for West Indies tour of India 2026, along with updated squad for Japan T20I & Asian Games.
More Details ▶️https://t.co/Lxx3Bz8Q14 pic.twitter.com/Y9RGlQ09XK
— BCCI (@BCCI) September 16, 2026
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, औकिब नबी, यशस्वी जयस्वाल, नमन धीर.
भारताचा टी20 संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर). तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयांक यादव.
भारत वेस्ट इंडिज सामन्यांचं वेळापत्रक
- 1st ODI: 27 सप्टेंबर 2026 (रविवार) रोजी तिरुवनंतपुरम (Trivandrum) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
- 2nd ODI: 30 सप्टेंबर 2026 (बुधवार) रोजी गुवाहाटी (Guwahati) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
- 3rd ODI: 03 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी न्यू चंदीगड (New Chandigarh) येथे दुपारी 2:00 वाजता खेळवला जाईल.
- 1st T20I: 06 ऑक्टोबर 2026 (मंगळवार) रोजी लखनऊ (Lucknow) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
- 2nd T20I: 09 ऑक्टोबर 2026 (शुक्रवार) रोजी रांची (Ranchi) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
- 3rd T20I: 11 ऑक्टोबर 2026 (रविवार) रोजी इंदूर (Indore) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
- 4th T20I: 14 ऑक्टोबर 2026 (बुधवार) रोजी हैदराबाद (Hyderabad) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.
- 5th T20I: 17 ऑक्टोबर 2026 (शनिवार) रोजी बेंगळुरू (Bengaluru) येथे सायंकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल.