
वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या टी 20i सामन्यात 30 धावांनी विजय मिळवला. भारताने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने आघाडी मिळवली. ओपनर स्मृती मंधाना, शफाली वर्मा आणि ऋचा घोष या तिघींनी भारताच्या या विजयात बॅटिंगने प्रमुख योगदान दिलं. या तिघींनी तोडफोड खेळी करत भारताला 221 धावांपर्यंत पोहचवलं. शफाली आणि स्मृती या दोघींनी य सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या. तर ऋचा घोष हीने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत फिनिशिंग टच दिला. स्मृती, शफाली आणि ऋचा या तिघींनी केलेल्या तडाखेदार खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात काही विक्रम केले आहेत.
भारतीय महिला संघाने 221 धावा केल्या. भारताने यासह टी 20I क्रिकेटमध्ये आपला सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम प्रस्थापित केला. याआधी भारताची टी 20I फॉर्मेटमध्ये 4 बाद 217 ही सर्वोच्च धावसंख्या होती. महिला संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध 2024 मध्ये नवी मुंबईत ही कामगिरी केली होती. तर भारताची 205 ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताने 2025 मध्येच ही धावसंख्या उभारली होती. टीम इंडियाने 221 धावांच्या खेळीत 28 चौकार आणि 8 षटकार लगावले.
स्मृती आणि शफाली या सलामी जोडीने 92 बॉलमध्ये 162 रन्सची पार्टनरशीप केली. यासह या जोडीने इतिहास घडवला. भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये ही कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी ठरली. स्मृती-शफाली जोडीने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. भारतासाठी याआधीही कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारीचा विक्रम हा स्मृती आणि शफाली या जोडीच्याच नावावर होता. तेव्हा दोघींनी 2019 साली वेस्ट इंडिज विरुद्ध 143 धावांची भागीदारी केली होती.
टीम इंडियाने या आधीच्या तिन्ही सामन्यात धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. मात्र चौथ्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून भारताला फलंदाजीची संधी दिली. त्याचा शफाली आणि स्मृती या जोडीने चांगलाच फायदा घेतला.
शफालीने अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. शफालीचं हे या मालिकेतील सलग तिसरं अर्धशतक ठरलं. शफालीला शतकाची संधी होती. मात्र शफालीला तिथपर्यंत पोहचता आलं नाही. शफालीने 46 बॉलमध्ये 12 फोर आणि 1 सिक्ससह 79 रन्स केल्या. तर पहिल्या तिन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या स्मृतीने शफालीपेक्षा 1 धाव जास्त केली. स्मृतीने 48 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 80 धावा केल्या. दोघींचं शतक हुकलं. मात्र दोघींनी भारताला ठोस सुरुवात मिळवून दिली.
शफाली आऊट झाल्यानंतर ऋचा घोष हीला तिसऱ्या स्थानी बॅटिंगची संधी देण्यात आली. ऋचाने याचा फायदा घेतला. ऋचाने फक्त 16 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 4 फोरसह नॉट आऊट 40 रन्स केल्या. तर कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने 10 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 16 धावा केल्या.