IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 5-0 ने सुपडा साफ, अंतिम सामन्यात 15 धावांनी विजय

India Women vs Sri Lanka Women 5th T20I Match Result : वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध विजयी पंच लगावला आहे. भारताने यासह 5-0 अशा एकतर्फी फरकाने लंका दहन केलं आहे.

IND vs SL : टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 5-0 ने सुपडा साफ, अंतिम सामन्यात 15 धावांनी विजय
Women Cricket Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Dec 30, 2025 | 11:10 PM

वूमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हीच्या नेतृत्वात 2025 या वर्षाचा अफलातून शेवट केला आहे. टीम इंडियाने तिरुवनंतपुरममधील पाचव्या आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 15 धावांनी (India vs Sri Lanka WIomen) मात केली आहे. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेला 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 160 धावाच करता आल्या. यासह भारताने हा सामना जिंकला. भारताचा हा या मालिकेतील सलग पाचवा विजय ठरला. भारताने यासह श्रीलंकेला 5-0 ने क्लिन स्वीप केलं. तर श्रीलंका भारत दौऱ्यासह 2025 वर्षाचा शेवट विजयाने करण्यात अपयशी ठरली.

श्रीलंकेला पहिलाच आणि मोठा झटका

टीम इंडियाने 176 धावांचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पहिलाच आणि मोठा झटका दिला. टीम इंडियाने श्रीलंकेची कॅप्टन चमारी अट्टापट्टू हीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये 2 धावेवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यामुळे श्रीलंकेला विजयाची आशा होती. मात्र इमेशा दुलानी अर्धशतकानंतर आऊट झाली. इमेशा आऊट होताच निर्णायक भागीदारी मोडीत निघाली. इमेशा आणि हसिनी या दोघींनी 56 चेंडूत 79 धावांची भागीदारी केली. इमेशाने 39 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा स्कोअर 2 आऊट 86 असा झाला.

त्यानंतर टीम इंडियाने ठराविक अंतराने श्रीलंकेला झटके दिले. भारताने श्रीलंकेला 55 धावात 5 झटके दिले. त्यामुळे श्रीलंकेची 17.5 ओव्हरमध्ये 7 आऊट 140 अशी स्थिती झाली. त्यानंतर श्रीलंकेला उर्वरित 13 चेंडूत 20 धावाच जोडता आल्या. श्रीलंकेसाठी इमेशा दुलानी व्यतिरिक्त हसिनीने 65 धावांची खेळी. त्याव्यतिरिक्त श्रीलंकेच्या एकाही महिला फलंदाजांला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. टीम इंडियासाठी दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा, वैष्णवी शर्मा, श्री चरणी आणि अमनजोत कौर या 6 गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

महिला ब्रिगेडकडून श्रीलंकेचा धुव्वा

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियासाठी कॅप्टन हरमनप्रीत कौर हीने सर्वाधिक 68 धावांच खेळी केली. तर अरुंधती रेड्डी आणि अमनजोत कोर या जोडीने अखेरच्या क्षणी छोटेखानी आणि निर्णायक खेळी केली. अरुंधतीने नाबाद 27 तर अमनजोतने 21 धावा केल्या. तसेच इतरांच्या योगदानासह भारताने 7 विकेट्स गमावून 175 धावांपर्यंत मजल मारली. श्रीलंकेकडून कविषा दिलहारी, चमारी अट्टापट्टू आणि रष्मिका सेववंडी या तिघींनी टीम इंडियाच्या प्रत्येकी 2-2 फलंदाजांना बाद केलं. तर निमाषा मदुषनी हीने 1 विकेट मिळवली.