
वुमन्स वनडे वर्लडकप 2025 स्पर्धेत काठावर पास होत टीम इंडियाने उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे. आता जेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडियाला दोन विजय आवश्यक आहे. टीम इंडियाला पहिल्यांदा जेतेपद मिळवण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावे लागणार आहेत. मात्र या सामन्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणारी प्रतिका रावल वर्ल्डकप उपांत्य फेरीत खेळणार नाही. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना प्रतिका जखमी झाली होती. पाय मुरगळल्याने फलंदाजीला उतरली नव्हती. आता 30 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही खेळणार नाही. त्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. बाद फेरीच्या सामन्यातच फॉर्मात असलेली प्रतिका रावल खेळणार नसल्याने टीम इंडियाची धाकधूक वाढली आहे.
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सहा डावात प्रतिका रावलने 51.33 च्या सरासरीने 308 धावा केल्या आहेत. स्मृती मंधानानंतर सर्वाधिक धावा करणारी फलंदाज आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे न्यूझीलंडवर दबाव वाढला. तसेच 300 पार धावा करण्यास मदत झाली होती. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियासारखा दिग्गज संघ असताना प्रतिका रावलची गैरहजेरी चिंता वाढवणारी असणार आहे. आता प्रतिका रावलच्या जागी ओपनिंग कोण उतरणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात प्रतिका रावल नसल्याने ओपनिंगला कोण उतरणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे तिची जागा कोण घेणार हा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात अमनजोत कौरला ओपनिंग करण्याची संधी दिली जाऊ शकते. कारण बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात प्रतिका गैरहजेरीत तिने ओपनिंग केली होती. इतकंच काय तर स्मृती मंधानासोबत 52 चेंडूत 57 धावांची भागीदारी केली होती. दुसरीकडे, हरलीन देओलचा पर्याय देखील असणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. याची प्रचिती साखळी फेरीत आली आहे. 331 धावांचं मोठं लक्ष्य ठेवूनही भारतीय संघाला या धावा रोखता आल्या नव्हत्या. त्यात ऑस्ट्रेलियाची या स्पर्धेत विजयी घोडदौड सुरुच आहे. त्यांनी एकही सामना न गमावता उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.