MI vs RR : हार्दिक पांड्याने मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट सांगितला, कुठे चुकलं ते

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबईच्या वाटेला सलग तिसरा पराभव आला आहे. यामुळे पाचवेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फॅन्सचा हिरमोड झाला आहे. राजस्थान रॉयल्सने 27 चेंडू राखून पराभव केल्याने रनरेटवरही फरक पडला आहे. त्यामुळे या मुंबईला पुढे जाऊन डोकं वर काढणं आणखी कठीण होणार आहे. या पराभवाचं विश्लेषण मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने करत सांगितलं की..

MI vs RR : हार्दिक पांड्याने मुंबईच्या पराभवाचा टर्निंग पॉइंट सांगितला, कुठे चुकलं ते
MI vs RR : हार्दिक पांड्याने मुंबईच्या पराजयाचं असं केलं विश्लेषण, पराभवाचं सांगितलं कारण
| Updated on: Apr 01, 2024 | 11:35 PM

आयपीएल स्पर्धेत जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबई इंडियन्सची साखळी फेरीत दाणादाण उडाली. सलग तीन सामन्यात पराभव झाल्याने पुढचा प्रवास आणखी कठीण झाला आहे. प्लेऑफचं गणित सोडवण्यासाठी आता मुंबई इंडियन्सला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादने 63 धावांनी, तर राजस्थान रॉयल्सने 6 गडी आणि 27 चेंडू राखून पराभूत केल्याने रनरेटवर प्रभाव पडला आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सने नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं. मुंबईची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली. आघाडीच्या तीन फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. मुंबईने 9 गडी गमवून 125 धावा केल्या आणि राजस्थानसमोर 126 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रियान परागच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावार 15.3 षटकात पूर्ण झालं. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने मन मोकळं केलं. तसेच कुठे काय चुकलं ते सांगितलं.

हार्दिक पांड्या म्हणाला की, “एक कठोर रात्र आहे. आमची सुरुवात एकदम निराशाजनक राहिली. मला काउंटर करायचा होता, आम्ही 150-160 च्या आसपास पोहोचण्याच्या चांगल्या स्थितीत होतो. पण माझ्या विकेटमुळे त्यांना खेळात परत येण्याची परवानगी मिळाली, मला आणखी बरेच काही करायचे होते. आम्हाला अशा खेळपट्टीची अपेक्षा नव्हती. कधीकधी गोलंदाजांना म्हणणे चांगले असते. एक संघ म्हणून आम्हाला विश्वास आहे की आम्ही बरेच चांगले करू शकतो. परंतु आम्हाला थोडे अधिक शिस्तबद्ध असणे आणि खूप धैर्य दाखवणे आवश्यक आहे.”

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने सांगितलं की, ” माझ्या मते नाणेफेक हा गेम चेंजर होता. बोल्ट आणि बर्गरच्या अनुभवाने आम्हाला मदत केली. 4-5 विकेट पडतील अशी अपेक्षा नव्हती. पण आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करतील याची आम्हाला कल्पना होती.”

मुंबईला विजयासाठी आणखी एका सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. मुंबईचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्ससोबत आहे. 7 एप्रिलला म्हणजेच थेट रविवारी हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर 11 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामना असणार आहे. हे सामनेही वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल खऱ्या अर्थाने महत्त्वाचा ठरणार आहे.