
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात सलग दुसरा विजय मिळवला आहे.आरसीबीने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 8 व्या सामन्यात होम टीम चेन्नई सुपर किंग्सचा एमए चिदंबरम स्टेडियममध्ये 50 धावांनी धुव्वा उडवला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 197 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र चेन्नईच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले.चेन्नईला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 146 धावाच करता आल्या. आरसीबीने यासह अखेर अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवली आणि 2008 नंतर चेन्नईत विजय मिळवला.
टॉप ऑर्डरमधील रचीन रवींद्र याचा अपवाद वगळता इतर सर्वांनी निराशा केली. चेन्नईकडून रचीन रवींद्र याने सर्वाधिक 41 धावा केल्या. मात्र 197 धावांचं आव्हान पाहता रचीनची खेळी संथ ठरली. रचीन 31 बॉलमध्ये 5 चौकारांसह 41 रन्स करुन आऊट झाला. राहुल त्रिपाठी याने 5 धावा केल्या. तर कर्णधार ऋतुराज गायकवाड याला भोपळाही फोडता आला नाही. दीपक हुड्डा 4 आणि सॅम करन याने 8 धावा केल्या.
त्यानंतर शिवम दुबे याने 19 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. चेन्नईच्या एकाही फलंदाजाने विजयासाठी प्रयत्नच केले नाहीत. शिवमनंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात येईल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र शिवमनंतर आर अश्विन मैदानात आला. अश्विनने 8 बॉलमध्ये 11 रन्स केल्या. अश्विननंतर महेंद्रसिंह धोनी मैदानात आला. मात्र तोवर परिस्थिती फार अवघड झाली होती. धोनी आणि रवींद्र जडेजा या जोडीकडून यलो आर्मीला आशा होती. या दोघांनी अनेकदा अशक्य वाटणाऱ्या स्थितीतून चेन्नईला जिंकवलं आहे. मात्र आता तसं होऊ शकलं नाही.
जडेजाने काही फटके मारले. मात्र एका क्षणानंतर चेन्नईच्या पराभवाची औपचारिकताच राहिली. जडेजा 19 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्ससह 25 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने काही फटके मारुन चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि पराभवातील धावांचं अंतर कमी केलं. धोनीने 16 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह नाबाद 30 रन्स केल्या. तर नूर अहमद शून्यावर नाबाद परतला. दुसऱ्या बाजूला आरसीबीकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. यश दयाल आणि लियाम लिविंगस्टोन या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार याने 1 विकेट घेतली.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद.