
आयपीएलच्या 18 व्या मोसमात आतापर्यंत आश्वासक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्सला गुरुवारी 10 एप्रिलला मोठा झटका लागला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याला कोपराला झालेल्या दुखापतीमुळे या हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या चेन्नईचं टेन्शन आणखी वाढलं आहे. ऋतुराजच्या अनुपस्थितीत आता महेंद्रसिंह धोनी याच्या खांद्यावर उर्वरित हंगामासाठी चेन्नईची धुरा असणार आहे. धोनी विकेटकीपिंगसह कर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे आता धोनीसमोर ऋतुराजच्या अनुपस्थिति चेन्नईला विजयी ट्रॅकवर आणण्याचं आव्हान असणार आहे.
चेन्नईचा या मोसमातील खेळलेल्या 5 पैकी 4 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव करत या मोहिमेत विजयी सुरुवात केली. मात्र त्यानंतर चेन्नई विजयाच्या ट्रॅकवरुन घसरली. चेन्नईने सलग 4 सामने गमावले. चेन्नईने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिट्ल्स आणि पंजाब किंग्सने पराभूत केलं. विशेष बाब म्हणजे चेन्नईचा या चारही सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना पराभव झालाय. याचाच अर्थ असा की चेन्नईचे फलंदाज कुठेतरी अपयशी ठरत आहेत. त्यामुळे कर्णधार धोनीला फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तसेच स्पर्धेत आव्हान कायम राखायचं असेल तर इतरांनाही त्यांची भूमिका चोख बजावण्याशिवाय गत्यंतर नाही. अशात आता धोनीची सीएसके कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
दरम्यान महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासातील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने 2008 ते 2023 पर्यंत चेन्नई आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्सचं नेतृत्व केलं आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे. धोनीने आयपीएलमध्ये 226 सामन्यामध्ये नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 133 सामन्यात धोनी कर्णधार म्हणून यशस्वी ठरला आहे. तर 91 सामन्यात धोनीच्या संघाला पराभूत व्हावं लागलं आहे. धोनीची कर्णधार म्हणून विजयी आकेडवारी ही 59 टक्के अशी आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघ: महेंद्रसिंह धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, सॅम करन, आर अश्विन, मथीशा पाथिराना, कमलेश नागरकोटी, नॅथन एलिस, मुकेश चौधरी, राहुल त्रिपाठी, दीपक हुड्डा, खलील अहमद, जेमी ओव्हरटन, शेख रशीद, अंशुल कंबोज, श्रेयस गोपाल, नूर अहमद, गुर्जपनीत सिंग, रामकृष्ण घोष, आंद्रे सिद्धार्थ सी आणि वंश बेदी.
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.