अभिषेक शर्मा म्हणाला शांत हो..! प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात शुबमन गिलचा राडा, पंचांशी घातला वाद

आयपीएल 2025 स्पर्धेतील 51व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल चांगलाच संतापलेला दिसला. पहिल्यांदा आऊट दिला तेव्हा आणि नंतर प्रसिद्ध कृष्णाच्या षटकावेळी राग अनावर झाला. त्याने थेट पंचांशी वाद घातला.

अभिषेक शर्मा म्हणाला शांत हो..! प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात शुबमन गिलचा राडा, पंचांशी घातला वाद
शुबमन गिल
Image Credit source: Twitter
| Updated on: May 03, 2025 | 1:25 AM

आयपीएल 2025 स्पर्धेत शुबमन गिलचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला. शुबमन गिल इतरवेळी मैदानात शांतपणे वावरत असतो. मात्र सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याला राग अनावर झाला. फलंदाजी करताना त्याला वादग्रस्त पद्धतीने बाद दिल्यानंतर गिल वैतागला होता. त्यामुळे शुबमन गिलचं या स्पर्धेतील पहिलं शतक हुकलं. शुबमन गिलने 38 चेंडूत 10 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न करताना गिलला वादग्रस्त पद्धतीने बाद दिलं. खरं तर अशावेळी फलंदाजालाच संशयाचा फायदा मिळतो आणि त्याला नाबाद घोषित केले जाते. पण यावेळी तिसऱ्या पंचांनी आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि गिलला धावबाद घोषित केले. त्यानंतर शुबमन गिलचा राग अनावर झाला आणि त्याने पंचाशी वाद घातला. अशीच काहीशी स्थिती सनरायझर्स हैदराबादच्या डावातील 14व्या षटकात घडला. तेव्हा प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजी करत होता आणि चौथ्या चेंडूवर घडला.

अभिषेक शर्मा 68 धावांवर खेळत होता. तेव्हा प्रसिद्ध कृष्णाने त्याला यॉर्कर चेंडू टाकला. एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील करण्यात आलं. पण पंचांनी काही बाद दिलं नाही. चेंडू लेग स्टंपबाहेर जात असल्याचं सांगितलं. पण कर्णधार शुबमन गिलने प्रसिद्ध कृष्णाशी चर्चा केल्यानंतर रिव्ह्यू घेतला. यावेळी बॉल-ट्रॅकिंगमध्ये काही बिघाड असल्याचे दिसून आलं. त्यात बॉल कुठे पिच झाला हे दाखवले गेले नाही, फक्त इम्पॅक्ट आणि विकेट दाखवल्या गेल्या. त्यामुळे गुजरातला एक रिव्ह्यू गमवण्याची वेळ आली होती. त्यामुळे शुबमन गिल वैतागलेला दिसला. शुबमन गिलने पंचांशी वाद घातला. त्यानंतर दोन्ही पंच चर्चा करत गिलला काहीतरी समजावून सांगत होते. मात्र गिल काही ऐकण्यास तयार नव्हता. त्याला अजूनही खात्री नव्हती. वाद वाढत असल्याचं पाहून अभिषेक शर्मा त्याला शांत होण्यास सांगत आहे.

सनरायझर्स हैदराबात स्पर्धेतून आऊट

चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स यांच्यानंतर स्पर्धेतून आऊट होणारा सनरायझर्स हैदराबाद हा तिसरा संघ ठरला. गुजरात टायटन्सने विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान काही सनरायझर्स हैदराबादला गाठता आलं नाही. सनरायझर्स हैदराबादने 10 पैकी 7 सामने गमावले आणि फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता प्लेऑफचं गणित काही सुटणार आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाद झाला.