IPL 2025 : मुंबईसमोर सर्वात मोठं आव्हान काय? हेड कोचने सर्वांसमोर काय म्हटलं?
IPL 2025 Mumbai Indians : मुंबईसाठी 18 व्या मोसमात सर्वात मोठं आव्हान काय असणार? याबाबत हेड कोच महेला जयवर्धने यांनी काय म्हटलं? जाणून घ्या.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात पहिली यशस्वी टीम असा लौकीक असणाऱ्या मुंबई इंडियन्सचा 18 व्या मोसमातील (IPL 2025) पहिला सामना हा 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. मुंबईने 2020 साली अखेरीस आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून मुंबई आयपीएलच्या सहाव्या ट्रॉफीच्या प्रतिक्षेत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईची 17 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली. त्यामुळे यंदा पलटण पूर्ण तयारीने सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र याआधी मुंबईसमोरील सर्वात मोठं आव्हान काय आहे? याबाबत हेड कोच महेला जयवर्धने यांनी सांगितलंय.
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील सुरुवातीच्या काही सामन्यात जसप्रीत बुमराह नसणं हे मुंबईसाठी आव्हानात्मक असेल, असं जयवर्धने यांना वाटतं. मात्र बुमराह लवकरात लवकर टीमसह जोडला जाईल, असा विश्वासही जयवर्धने यांनी व्यक्त केला. बुमराह सध्या बंगळुरुतील एनसीएत दुखापतीतून सावरत आहेत.
जयवर्धन काय म्हणाला?
“बुमराहच्या दुखापतीबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. सध्या सर्व काही व्यवस्थित सुरु आहे आणि तो सकारात्मक आहे. बुमराहचं नसणं हे आव्हान आहे. बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. बुमराहने मुंबईसाठी शानदार कामगिरी केली आहे. तसेच बुमराह नसणं ही दुसऱ्यासाठी संधी आहे. आम्ही याकडे अशा दृष्टीने पाहत आहोत”, असं जयवर्धने यांनी म्हटलं.
बुमराहला पाठीचा त्रास
दरम्यान जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे 18 व्या मोसमातील काही सामन्यांना मुकावं लागणार आहे. बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात दुखापत झाली होती. बुमराहला झालेल्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठा फटका बसला. बुमराहला या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला मुकावं लागलं. तसेच आता बुमराहला 18 व्या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांना मुकावं लागणार आहे.
सूर्यकुमार यादव कॅप्टन
दरम्यान बीसीसीआयने हार्दिक पंड्या याच्यावर स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घातली आहे. त्यामुळे हार्दिक 23 मार्चला चेन्नईविरुद्ध खेळणार नसल्याचं स्पष्ट आहे. अशात हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबईचं नेतृत्व करणार आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
चेन्नईविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्स टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, तिलक वर्मा, जोफ्रा आर्चर, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकल्टन, दीपक चाहर, अल्लाह गझनफर, विल जॅक्स, केएल श्रीजीत, रीस टॉप्ली, मिचेल सँटनर, राज अंगद बावा, वी. सत्यनारायण, बेवन जॅकब्स, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश आणि अश्वनी कुमार.
