Video : गुजरात टाययन्सला एका चुकीमुळे 78 धावांचा बसला फटका, जर तसं झालं नसतं तर….

आयपीएल 2025 स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससमोवर विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं आहे. यात 78 धावा या एका चुकीमुळे आल्या आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्सचं धावांचं पाठलाग करताना मोठं नुकसान झालं आहे.

Video : गुजरात टाययन्सला एका चुकीमुळे 78 धावांचा बसला फटका, जर तसं झालं नसतं तर....
गुजरात टायटन्स
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 30, 2025 | 10:26 PM

आयपीएल 2025 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने आले आहेत. नाणेफेकीचा कौल मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांची चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. यासह मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 228 धावा केल्या आणि विजयासाठी 229 धावांचं आव्हान दिलं. या धावसंख्येत 78 धावा या फक्त एका चुकीमुळे आल्या आहेत. तुम्ही वाचलं ते अगदी बरोबर आहे. गुजरात टायटन्सने दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर केलेली चूक महागात पडली. ही दुसरी तिसरी काही नसून रोहित शर्माचा झेल आहे. तेव्हा रोहित शर्मा हा फक्त 3 धावांवर होता. रोहित शर्माला बाद करण्यात लवकर यश आलं असतं तर कदाचित मुंबई इंडियन्सची धावसंख्या 200 च्या आत असती. तसेच विकेट पटकन मिळाल्याने मुंबई इंडियन्सवर दबावही वाढला असता.

दुसरं षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा आला होता. तो टाकत असलेल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रोहित शर्माने उत्तुंग फटका मारला. हा चेंडू खूपच वर चढला. पण हा झेल गेराल्ड कोएत्झीला काही पकडता आला नाही. असं नाही की पहिलीच चूक होती. तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तसंच घडलं. रोहित शर्माचा झेल कुसल मेंडिसने सोडला. तेव्हा रोहित शर्मा 12 धावांवर होता. रोहित शर्माने या सामन्यात 50 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकार मारत 81 धावांची खेळी केली.

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्ससाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे दोन्ही संघ विजयासाठी धडपड करत आहे. गुजरात टायटन्सला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्यामुळे टीम बॅकफूटवर आली होती. पण साई सुदर्शनने जबरदस्त खेळीचे दर्शन घडवलं. दडपणातही त्याने चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांवर दडपण वाढलं आहे.