RCB vs PBKS : पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका

Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings : श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर मात करत एकतर्फी विजय मिळवला. पंजाबचा हा एकूण पाचवा विजय ठरला. तर आरसीबीचा हा घरच्या मैदानातील सलग आणि एकूण तिसरा पराभव ठरला.

RCB vs PBKS : पंजाबसाठी विजयानंतर गूड न्यूज, आरसीबीला तिसऱ्या पराभवानंतर मोठा झटका
Virat Kohli RCB vs PBKS IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 19, 2025 | 4:23 PM

पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर 5 विकेट्सने मात केली. पावसामुळे 14 ओव्हरच्या झालेल्या या सामन्यात आरसीबीने पंजाबला विजयासाठी 96 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 12.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहजपणे पूर्ण केलं. आरसीबीचे फलंदाज या सामन्यात सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आरसीबीला घरच्या मैदानात सलग आणि एकूण तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला पंजाबला या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तसेच आरसीबी पराभवानंतर टॉप 3 मधून बाहेर झाली आहे.

आरसीबीने घराबाहेरील सर्व सामने जिंकले आहेत. मात्र घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीला विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. तर दुसऱ्या बाजूला पंजाबने आरसीबीवर मात करत या मोसमातील पाचवा विजय साकारला. पंजाब अशी कामगिरी करणारी दिल्लीनंतर दुसरी टीम ठरली आहे. पंजाबने या पाचव्या विजयासह पॉइंट्स टेबलमधील आपला दबदबा कायम राखला आहे. पंजाब या विजयासह पुन्हा टॉप 2 मध्ये पोहचली आहे.

पॉइंट्स टेबलमधील स्थिती

ताज्या आकडेवारीनुसार दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह पहिल्या स्थानी आहे. तर पंजाब किंग्स दुसऱ्या स्थानी आहे. दिल्लीचा नेट रनरेट हा पंजाबच्या तुलनेत चांगला असल्याने ते नंबर 1 आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुजरात आरसीबी विरुद्ध पंजाब सामन्याआधी दुसऱ्या क्रमांकावर होती. गुजरातने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर आरसीबीनेही तितकेच सामने जिंकले आहेत. मात्र नेट रनरेटमुळे आरसीबी जीटीमागे आहे. तर लखनौ सुपर जायंट्स 8 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे.

गतविजेता केकेआर सहाव्या स्थानी

गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स सहाव्या स्थानी आहे. केकेआरने 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत. मुंबईनेही 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. पलटण सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. मात्र केकेआरचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षा चांगला आहे.

पंजाबचा विजयी ‘पंच’

राजस्थान रॉयल्स आठव्या स्थानी आहे. राजस्थानने 8 पैकी 6 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्सची स्थिती राजस्थान रॉयल्सप्रमाणेच आहे. या तिन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत.