
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात लढत होणार आहे. महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. तर रजत पाटीदार याच्याकडे आरसीबीच्या कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. चेन्नई आणि आरसीबी या दोन्ही संघांचा हा या हंगामातील प्रत्येकी 11 वा सामना असणार आहे. तसेच दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. याआधी उभयसंघात 28 मार्चला लढत झाली होती. तेव्हा आरसीबीने चेन्नईवर 50 धावांनी मात केली होती. त्यामुळे चेन्नईकडे या सामन्यात या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. चेन्नई बंगळुरुचा हिशोब बरोबर करणार का? याकडे यलो आर्मीच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना शनिवारी 3 मे रोजी खेळवण्यात येणार आहे.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे होणार आहे.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
आरसीबी विरुद्ध चेन्नई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
आरसीबी विरुद्ध चेन्नई लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान आरसीबीने या हंगामात 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. तर 3 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. आरसीबी 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आरसीबीकडे हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये धडक देण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नईचं या हंगामातील आव्हान संपुष्टात आलं आहे. चेन्नईला 10 फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. त्यामुळे चेन्नईचा अखेरच्या काही सामन्यांमध्ये विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. चेन्नई अशात विजय मिळवून प्लेऑफआधी आरसीबीच्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान या सामन्यानिमित्ताने विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी हे अनुभवी आणि दिग्गज खेळाडू पुन्हा आमनेसामने असणार आहेत. दोन्ही खेळाडूंची ही या मोसमात एकमेकांसमोर येण्याची अखेरची वेळ असणार आहे. त्यामुळे या दोघांपैकी कोण सरस ठरणार? हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.