MI vs PBKS : ‘आज मला याला फोडायचा आहे’, रोहित शर्माने क्वॉलिफायर 2 फेरीआधीच मनातलं सांगून टाकलं

आयपीएल 2025 स्पर्धेच्या क्वॉलिफायर 2 फेरीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेली मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येत आहे. या सामन्यात सर्वांचं लक्ष हे रोहित शर्माच्या फलंदाजीकडे असणार आहे. असं असताना त्याने आपल्या मनातील हेतू सर्वांसमोर उघड केला आहे.

MI vs PBKS : आज मला याला फोडायचा आहे, रोहित शर्माने क्वॉलिफायर 2 फेरीआधीच मनातलं सांगून टाकलं
रोहित शर्मा
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 01, 2025 | 3:43 PM

एलिमिनेटर फेरीत गुजरात टायटन्सने दोन जीवदान दिल्यानंतर रोहित शर्माने पुन्हा संधी दिली नाही. रोहित शर्माने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडला. गुजरात टायटन्सविरुद्ध 81 धावांची खेळी केली. आता मुंबई इंडियन्सचा क्वॉलिफायर 2 फेरीत पंजाब किंग्सशी सामना होणार आहे. या सामन्यातही रोहित शर्माकडून तशाच खेळीची अपेक्षा आहे. रोहित शर्माचं फलंदाजी करताना सर्वात मोठं अस्त्र हे पूल शॉट आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याच्या इतका जबरदस्त पूल शॉट कोणी मारत नाही असं क्रिकेटपटू स्वत: सांगतात. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने या पूल शॉट मागचं गणित उलगडलं. लहानपणी सिमेंटच्या विकेट सुरु केलेली फलंदाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करणारी आहे. रोहित शर्माने सांगितलं की त्याच्या क्रिकेटची सुरुवात मुंबईच्या सिमेंट विकेटवर झाली. या विकेट फलंदाजी करण्याचं तंत्र वेगळं होतं.

10-12 वर्षांचा असताना हेल्मेट वापरणं होत नव्हतं. त्यावेळेस रोहित शर्मा आणि त्याच्या मित्रांचं म्हणणं एकच असायचं की ‘आज या बॉलरला फोडायचं आहे.’ रोहित शर्माने पुढे हसत सांगितलं की, ‘आमच्या डोक्यात हेच सुरु असायचं की या बॉलरला खूप फोडायचं.’ त्या काळात पाठून जोरात चेंडू टाकायचे आणि सिमेंट विकेटवर बॉल पडला की वेगाने यायचा. अशा स्थितीत बॉल सोडणं किंवा बचाव करण्याची संधी कमीच असायची, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला. ‘सिमेंट विकेटवर चेंडू इतक्या वेगाने यायचा की आम्हाला बॅकफूटवर जाऊन खेळायला लागायचं. तिथे पर्याय नसल्याने पूल शॉट खेळायला लागायचा.’

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूल खेळण्यात तरबेज असलेला खेळाडू ठरला. रोहित शर्माने बॅकफूट गेम इतका सक्षम केला की आज पाय न हलवता जबरदस्त पूल शॉट मारतो. पण कधी कधी या तंत्राचा फटका बसतो असंही रोहित शर्माने मान्य केलं. ‘कधी कधी यामुळे थोडं नुकसान होतं. पण प्रॅक्टिस करत असल्याने चांगल्या प्रकारे खेळतो.’, असं रोहित शर्मा म्हणाला. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात क्वॉलिफायर दोन सामना होत आहे. या सामन्यात रोहित शर्माकडून फार अपेक्षा आहेत. आता रोहित शर्मा काय करतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.