पाय फ्रॅक्चर, उठता येईना, वैभवच्या तुफान शतकानंतर राहुल द्रविडचं बेभान सेलिब्रेशन; Video पाहाच!
आयपीएल 2025 स्पर्धेत राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी चर्चेत राहिली. त्याने 35 चेंडूत शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीनंतर राहुल द्रविडही सेलीब्रेशनपासून स्वत:ला रोखू शकला नाही.

आयपीएल 2025 स्पर्धेत जबरदस्त खेळीचं दर्शन राजस्थान रॉयल्सच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीकडून घडलं. या स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात षटकार ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता शतक ठोकून सर्वांच्या कौतुकाची थाप त्याच्या खांद्यावर पडला. वैभव सूर्यवंशीने फक्त शतक ठोकलं नाही, तर कमी वयात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शतकी खेळीत वैभव सूर्यवंशीने 11 षटकार मारले. एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच कमी वयात आणि कमी चेंडूत शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरला आहे. त्याने 35 चेंडूत शतक ठोकलं. यापूर्वी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावावर होता. त्याने 37 चेंडूत शतकी खेळी केली होती. पण आता हा विक्रम वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे. सर्वात कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने 2013 मध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध 30 चेंडूत शतक ठोकलं होतं. या यादीत वैभव सूर्यवंशी दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे त्याने षटकार मारून शतक पूर्ण केलं. त्याच्या शतकानंतर राजस्थान रॉयल्सच्या डगआऊटमध्ये एकच जल्लोष झाला.
गुजरात टायटन्सचा कर्णधाराने 11 वं षटक टाकण्यासाठी राशीद खानच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर एक धाव घेत जयस्वालने वैभवला स्ट्राईक दिली. वैभव 34 चेंडूंचा सामना करून 94 धावांवर होता. खरं तर तो आरामात खेळू शकला असता. पण त्याने त्याच्या नैसर्गिक खेळापुढे कसलीच तमा बाळगली आणि राशीद खानला उत्तुंग षटकार मारला. त्याने षटकार मारून शतक केल्यानंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. फ्रॅक्चर असल्याचं विसरून गेला आणि थेट लडखडत उठला आणि टाळ्या वाजून 14 वर्षांच्या वैभवचं कौतुक केलं. राहुल द्रविडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Vaibhav Suryavanshi’s knock made Rahul Dravid stand up from the wheelchair🫡
14 Year old Vaibhav Suryavanshi scores the fastest 100 by an Indian in IPL 🥶#RRvsGT | #VaibhavSuryavanshi | #GTvsRRpic.twitter.com/fpJyffKelA
— Indian Cricket Team (@incricketteam) April 28, 2025
राजस्थान रॉयल्सने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण गुजरात टायटन्सने 20 षटकात 209 धावा करून विजयासाठी 210 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानने 15.5 षटकात पूर्ण केलं. वैभव सूर्यवंशी सामन्यानंतर म्हणाला की, ‘खूप छान वाटत आहे. आयपीएलमधील हे माझे पहिले शतक आहे आणि ही माझी तिसरी इनिंग आहे. स्पर्धेपूर्वीच्या सरावानंतर निकाल येथे दिसून आला आहे. आयपीएलमध्ये 100 धावा करणे हे स्वप्न होते आणि आज ते प्रत्यक्षात आले. कोणतीही भीती नाही. मी जास्त विचार करत नाही, मी फक्त खेळण्यावर लक्ष केंद्रित करतो.’
