
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 51व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने होमग्राउंडवर सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांच्या चिंध्या उडवल्या. सलामीला आलेल्या साई सुदर्शन आणि शुबमन गिल यांनी 87 धावांची भागीदारी केली. यात साई सुदर्शनने 23 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. त्याचं अर्धशतक फक्त दोन धावांनी हुकलं. पण साई सुदर्शनचा या स्पर्धेतील फॉर्म जबरदस्त राहिला आहे. प्रत्येक सामन्यात त्याने आपलं योगदान दिलं आहे. इतकंच काय तर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीची धुलाई केली. एकाच षटकात पाच चौकार मारले. यासह साई सुदर्शनने टी20 क्रिकेटमध्ये 2000 धावांचा पल्ला गाठला आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला. साई सुदर्शन जबरदस्त फॉर्मात असून टीम इंडियाचं दार ठोठावलं आहे.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने डावातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक मोहम्मद शमीकडे सोपवलं. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर साई सुदर्शनने चौकार मारला. पण दुसरा चेंडू निर्धाव टाकण्यात साई सुदर्शनला यश आलं. मात्र त्यानंतर 22 वर्षीय साई सुदर्शनने चार चेंडूंवर चार चौकार मारले. एकंदरीत पाच चौकार मारत 20 धावा केल्या. साई सुदर्शनने हर्षल पटेललाही सोडलं नाही. त्याच्या षटकाची सुरुवातही चौकाराने केली. त्यानंतर शेवटच्या तीन चेंडूवर तीन चौकार मारले.
पॉवर प्लेमध्ये साई सुदर्शनने 20 चेंडूत 45 धावांची खेळी केली. पॉवर प्लेच्या सहा षटकात गुजरात टायटन्सने 82 धावा केल्या. यावेळी साई सुदर्शनने 35 डावात 1500 धावा पूर्ण केल्या. यासह कमी डावात हा पल्ला गाठणारा फलंदाज ठरला आहे. तसेच सचिन तेंडुलकरचा विक्रमही नावावर केला आहे. साई सुदर्शनने करिअरच्या 54व्या डावात 2000 टी20 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. सचिनने ही किमया 59 डावात केली होती. मात्र आता हा विक्रम साई सुदर्शनच्या नावावर झाला आहे.