SRH vs MI : सीएसकेनंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर, रोहित शर्मा गोलंदाजांच्या धुलाईसाठी सज्ज

Rohit Sharma SRH vs MI Ipl 2025 : रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध तोडफोड खेळी करत मुंबई इंडियन्सला सलग तिसरा विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता रोहितकडून पुन्हा एकदा हैदराबादविरुद्ध स्फोटक खेळीची अपेक्षा आहे.

SRH vs MI : सीएसकेनंतर सनरायजर्स हैदराबादचा नंबर, रोहित शर्मा गोलंदाजांच्या धुलाईसाठी सज्ज
Rohit Sharma MI vs CSK IPL 2025
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 22, 2025 | 8:42 PM

आयपीएल 2025 मध्ये मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात 20 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. मुंबईचा हा या 18 व्या मोसमातील एकूण चौथा विजय ठरला. मुंबईने या विजयासह चेन्नईविरुद्धच्या 23 मार्चच्या पराभवाचा वचपा घेतला. त्यानंतर आता मुंबई या मोसमातील आपला नवव्या सामन्यात 23 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध भिडणार आहे. हैदराबाद आणि मुंबई हे दोन्ही संघ 17 एप्रिलनंतर पुन्हा एकदा आमनेसामने असणार आहेत. मुंबईने 17 एप्रिलला हैदराबादवर 4 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हैदराबादवर मात करत सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला हैदराबादकडे गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे.

रोहितकडून पुन्हा मोठी खेळी अपेक्षित

मुंबईचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला 18 व्या मोसमातील 7 डावांमध्ये काही खास करता आलं नाही. रोहितची या मोसमातील सुरुवात शून्यापासून झाली. मात्र त्यानंतर रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहितने पहिल्या 7 डावांमध्ये अनुक्रमे 0, 8. 13, 17, 18 आणि 26 अशा धावा केल्या. रोहितला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता येत नव्हती. मात्र रोहितला घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सूर गवसला. रोहितने चेन्नईविरुद्ध 177 धावांचा पाठलाग करताना विजयी खेळी साकारली. त्यामुळे रोहितकडून हैदराबादविरुद्धही अशाच खेळीची अपेक्षा असणार आहे.

चेन्नईविरुद्ध स्फोटक खेळी

रोहितने चेन्नईविरुद्ध 45 बॉलमध्ये 4 फोर आणि 6 सिक्सच्या मदतीने 168.89 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 76 रन्स केल्या. रोहितने या खेळीसह मुंबईच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. रोहितचं हे या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं.

रोहितच्या 18 व्या मोसमातील एकूण धावा

रोहितने आतापर्यंत या 18 व्या मोसमातील 7 डावांमध्ये 154.90 च्या स्ट्राईक रेटने आणि 26.33 या सरासरीने 102 चेंडूत एकूण 158 धावा केल्या आहेत. रोहितची नाबाद 76 ही या मोसमातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. त्यामुळे रोहित हैदराबादविरुद्ध कशी कामगिरी करतो? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

रोहितसमोर पॅट कमिन्स याचं आव्हान

दरम्यान रोहित शर्मासमोर सनरायजर्स हैदराहबाविरुद्ध पॅट कमिन्स याचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. पॅट कमिन्स याने रोहितला 2024 पासून ते आतापर्यंत एकूण 3 वेळा आऊट केलं आहे. त्यामुळे रोहितला जर मोठी खेळी करायची असेल तर पॅटविरुद्ध सांभाळून खेळावं लागणार आहे. आता रोहित या आव्हानाचा कसा सामना करतो? याकडे पलटणच्या चाहत्यांचं लक्ष असणार आहे.