SRH vs MI : क्लासेन-अभिनव जोडीने हैदराबादची लाज राखली, मुंबईसमोर 144 रन्सचं टार्गेट, ऑरेंज आर्मी जिंकेल?

Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians 1st Innings Highlins In Marathi : सनरायजर्स हैदराबादने हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर या जोडीने निर्णायक भागीदारी करत सनरायजर्स हैदराबादला सन्मानजनक धावांपर्यंत पोहचवलं.

SRH vs MI : क्लासेन-अभिनव जोडीने हैदराबादची लाज राखली, मुंबईसमोर 144 रन्सचं टार्गेट, ऑरेंज आर्मी जिंकेल?
Abhinav Manohar andHeinrich Klaasen
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 23, 2025 | 9:52 PM

मुंबई इंडियन्स विरूद्धच्या सामन्यात निराशाजनक सुरुवातीनंतर हेनरिक क्लासेन आणि इम्पॅक्ट प्लेअर अभिनव मनोहर या जोडीने केलेल्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने घरच्या मैदानात सन्मानजनक धावा केल्या आहेत. हैदराबादने राजीव गांधी स्टेडियममध्ये पाहुण्या मुंबई इंडियन्ससमोर 144 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने हैदराबादला झटपट 5 झटके देत सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मात्र क्लासेन आणि अभिनव या जोडीने सहाव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली आणि हैदराबादला 140 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. हैदराबादने 8 विकेट्स गमावून 143 धावा केल्या.  त्यामुळे आता हैदराबादला घरच्या मैदानात विजय मिळवायचा असेल तर त्यांच्या गोलंदाजांनाच काही तरी करावं लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मुंबई सलग चौथ्या विजयासाठी सज्ज आहे.

हैदराबादची बॅटिंग

कर्णधार हार्दिक पंड्या याने टॉस जिंकला.  मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मुंबईच्या गोलंदाजांनी कर्णधार हार्दिकचा फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवत हैदराबादच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांना गुंडाळून मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या पहिल्या 4 फलंदाजांना दुहेरी आकड्यापर्यंतही पोहचू दिलं नाही. ट्रेव्हिस हेड याला तर भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर इशान किशन याला अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे मैदानाबाहेर जाव लागलं. ईशानने 1 धाव केली. अभिषेक शर्मा याने 8 धावा केल्या आणि मैदानाबाहेर गेला.नितीश रेड्डी याने 2 रन्स केल्या. तर अनिकेत वर्मा याने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे हैदराबादची 5 आऊट 35 अशी स्थिती झाली.

सहाव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी

हैदराबादने झटपट 5 विकेट्स गमावले. त्यामुळे हैदराबाद 100 धावा करेल का? अशी शंका क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित करण्यात आली. मात्र हेनरिक क्लासेन आणि अभिनव मनोहर या जोडीने हैदराबादला कमबॅक करुन दिलं आणि लाज राखली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी 99 रन्सची पार्टनरशीप केली. या दरम्यान क्लासेनने या मोसमातील पहिलंवहिलं अर्धशतक झळकावलं. मात्र जसप्रीत बुमराह याने ही जोडी फोडली. त्यामुळे मुंबईला दिलासा मिळाला. बुमराहने क्लासेनला तिलक वर्मा याच्या हाती कॅच आऊट केलं. क्लासेनने हैदराबादसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. क्लासेनने 44 बॉलमध्ये 9 फोर आणि 2 सिक्ससह 71 रन्स केल्या.

कोण मिळवणार 2 पॉइंट्स?

तर त्यानंतर अभिनव मनोहर याने 37 चेंडूत 3 सिक्स आणि 2 फोरसह 43 धावांची इमपॅक्टफुल खेळी केली. तर पॅट कमिन्स याने 1 धाव केली. तर हर्षल पटेल 1 धाव करुन नाबाद परतला. मुंबईकडून ट्रेन्ट बोल्ट याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. दीपक चाहर याने दोघांना आऊट केलं. तर जसप्रीत बुमराह आणि कॅप्टन हार्दिक पंड्या या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.