गौतम गंभीरनंतर आता युवराज सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत, या संघाकडून फिल्डिंग!
गौतम गंभीरने टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची धुरा हाती घेतली आहे. आता युवराज सिंगही या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, आयपीएलमध्ये युवराज सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळण केली जाण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलेला युवराज सिंग आयपीएलमधून पुनरागमन करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, युवराज सिंग गुजरात टायटन्सचा मुख्य प्रशिक्षक होऊ शकतो. गुजरात टायटन्सचे विद्यमान प्रशिक्षक आशिष नेहरा आणि संचालक विक्रम सोलंकी संघ सोडण्याची शक्यता आहे. जानेवारी 2022 मध्ये नेहराला गुजरात टायटन्सच्या मुख्य प्रशिक्षपदाची धुरा सोपवली होती. त्याच्या मार्गदर्शनासाठी गुजरातने अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आयपीएल 2023 स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण गुजरातची 2024 स्पर्धेत कामगिरी निराशाजनक राहिली. हार्दिक पांड्याला ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने संघात घेतलं. त्यानंतर ही धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती. यात गुजरातने फक्त 5 सामन्यात विजय, तर 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं होतं. दोन सामने पावसामुळे रद्द झाले होते. त्यामुळे गुजरात गुणतालिकेत आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
2025 आयपीएल मेगा लिलावापूर्वी आशिष नेहरा आणि विक्रम सोलंकी हे दोघे संघ सोडू शकतात. त्यामुळे गुजरात टायटन्स व्यवस्थापनाने युवराज सिंगशी संपर्क साधला आहे. त्यामुळे युवराज सिंग प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको. युवराज सिंगला आयपीएलचा दांडगा अनुभवही आहे. युवराज सिंगने मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर स्वीकारली तर त्याला मोठी रक्कम मिळू शकते. रिपोर्टनुसार, गुजरात टायटन्स आशिष नेहराला एका पर्वासाठी 3.5 कोटी रुपये देते. आता युवराज सिंगला यापेक्षा जास्त रक्कम मिळू शकते.
युवराज सिंगने आयपीएलमध्ये 132 सामन्यांमध्ये 2750 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे. इतकंच काय तर आयपीएलच्या सुरुवातीला सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू ठरला होता. त्यानंतर आयपीएलचं बजेट वाढलं आणि खेळाडूंना त्याच्यापेक्षा चांगली रक्कम मिळाली. युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटी रुपये मोजले होते. युवराज पंजाब, हैदराबाद, पुणे वॉरियर्स, आरसीबी, मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.
युवराज सिंगप्रमाणे टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक राहुल द्रविडही आयपीएलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. राहुल द्रविड पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्ससोबत येणार असल्याची चर्चा रंगली आहे. द्रविड यापूर्वीही राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक राहिला आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे.
