IPL 2026 Auction: 19 व्या मोसमासाठी ऑक्शन केव्हा? मोठी अपडेट समोर

Ipl 2026 Mini Auction Date : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या आगामी 19 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शनची तारीख समोर आली आहे. जाणून घ्या अपडेट.

IPL 2026 Auction: 19 व्या मोसमासाठी ऑक्शन केव्हा? मोठी अपडेट समोर
Ipl 2026 Mini Auction Date
Image Credit source: Bcci
| Updated on: Oct 10, 2025 | 1:34 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला पराभूत करत रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुने इतिहास घडवला. आरसीबीने रजत पाटीदार याच्या नेतृत्वात 17 वर्षांची प्रतिक्षा संपवत आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. त्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना 19 व्या मोसमाचे वेध लागले आहेत. या आगामी मोसमासाठी मिनी ऑक्शन केव्हा होणार? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना आहे. चाहत्यांची ही प्रतिक्षा अवघ्या काही दिवसांनी संपण्याची शक्यता आहे.

आयपीएलच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) मिनी ऑक्शन आणि खेळाडूंच्या रिटेंशनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. क्रिकबझनुसार, डिसेंबर महिन्यातील दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यादरम्यान मिनी ऑक्शन होऊ शकतं. तसेच फ्रँचायजी 15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्या खेळाडूला कायम ठेवायचं आणि कुणाला करारमुक्त करायचं? हे ठरवु शकते.

मिनी ऑक्शन कुठे होणार?

मिनी ऑक्शन कधी होणार यासह कुठे होणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. क्रिकबझच्या रिपोर्ट्सनुसार, ऑक्शन कुठे होणार? याबाबत माहिती नाही. आयपीएलच्या गेल्या 2 हंगामासाठीच्या ऑक्शनचं आयोजन हे विदेशात करण्यात आलं होतं. आयपीएलच्या 17 व्या मोसमासाठी ऑक्शन दुबईत आयोजित करण्यात आलं होतं. तर 18 व्या सिजनआधी मेगा ऑक्शन जेद्दाहमध्ये पार पडला होता. मात्र यंदा भारतातच ऑक्शन होऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही.

फ्रँचायजींसाठी महत्त्वाची अपडेट

ऑक्शनआधी प्रत्येक फ्रँचायजीला बीसीसीआयकडे करारमुक्त खेळाडूंची नावं द्यायची असतात. खेळाडूंची नावं देण्यासाठी एक ठराविक मुदत असते. त्याआधी ही नावं द्यावी लागतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा फ्रँचायजींना 15 नोव्हेंबरपर्यंत करारमुक्त खेळाडूंची नावं देण्याची मुदत आहे. रिपोर्ट्सनुसार, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा अपवाद वगळता इतर संघ खेळाडू करारमुक्त करण्याची शक्यता फार कमी आहे.

सीएसके-आरआर कुणाला करारमुक्त करणार?

रिपोर्ट्सनुसार, सीएसके दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, सॅम करन, विजय शंकर आणि डेव्हॉन कॉनव्हे या खेळाडूंना करारमुक्त करु शकते. तसेच आर अश्विन याने आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे सीएसकेची मोठी बचत होणार आहे.

तर राजस्थान रॉयल्स वानिंदु हसरंगा आणि महीश तीक्षणा या श्रीलंकन फिरकीपटू जोडीला रिलीज करु शकते. तसेच संजू सॅमसनही 19 व्या मोसमात नव्या संघाकडून खेळताना दिसणार आहे. या दोन्ही आयपीएल चॅम्पियन संघांना 18 व्या मोसमात काही खास करता आलं नव्हंत.