IPL 2026, KKR vs DC: दिल्ली कॅपिटल्सने केकेआरला नमवलं, विजयासह सहाव्या स्थानावर पूर्णविराम
आयपीएल 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर यांच्यात पार पडला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत सहावं स्थान गाठलं. तर केकेआरचा संघ सातव्या स्थानावर राहिला.

आयपीएल 2026 स्पर्धेतील 70 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले होते. हा दोन्ही संघांचा आणि या स्पर्धेच्या साखळी फेरीचा शेवटचा सामना होता. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा कोलकात्याच्या बाजूने लागला. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही कोलकाता नाईट रायडर्सला गाठता आलं नाही. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 40 धावांनी जिंकला. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने 39 चेंडूत 63 धावांची खेळी करून बाद झाला. या शिवाय कोणत्याही फलंदाजाला आक्रमक खेळी करून डाव पुढे नेता आला नाही. एकही फलंदाज 30च्या पुढे धावा करू शकला नाही. त्यात धडाधड विकेट पडल्या आणि पराभव निश्चित होत गेला.
दिल्ली कॅपिटल्सचा डाव
आयपीएलच्या शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून अभिषेक पोरेल आणि केएल राहुल यांना आश्वासक सुरूवात केली. पण संघाच्या 40 धावा असताना पोरेल 22 धावा करून बाद झाला. त्यानंतर साहिल परेखही फार काळ तग धरू शकला नाही. त्यााच खेळही 24 धावांवर आटोपला. पण केएल राहुलने अक्षर पटेलसोबत खेळ पुढे नेला. केएल राहुलने 30 चेंडूत 60 धावांची खेळी केली. अक्षर पटेलने 25 चेंडूत 39, तर डेविड मिलरने 19 चेंडूत 28 धावा करून बाद झाले. तर आशुतोश शर्माने 11 चेंडूत नाबाद 18 धावांची खेळी केली. ट्रिस्टन स्टब्सला एक चेंडू खेळायला मिळाला. पण त्या धावा काढता आली नाही.
आयपीएल स्पर्धेतून राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सचं आव्हान संपुष्टात आलं होतं. खरं तर या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात निराशाजनक झाली होती. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीतून आऊटच होणारा पहिला संघ ठरेल असं वाटलं होतं. पण केकेआरने कडवी झुंज दिली. सुरूवातील पाच सामन्यात पराभव आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे सहा सामन्यानंतर पदरात फक्त 1 गुण होता. त्यानंतर सलग चार सामन्यात विजय मिळवला. त्यानंतर आरसीबीकडून पराभव झाला. त्यानंतर सलग दोन सामने जिंकले.