48 तासापासून ढिगाऱ्याखाली, त्या 8 जणांचं काय झालं? कुटुंबीयांचा काळजाचा ठोका चुकला; मोशी दुर्घटनेचं रेस्क्यू ऑपरेशन सुरूच
पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील मोशी येथे कचऱ्याचा डोंगर कोसळून तीन मजल्याची इमारत कोसळल्याची घटना घडल्यानंतर ४८ तास उलटले असले तरी त्यात गाडले गेलेल्या आठ जणांचा थांगपत्ता लागलेला नाही.

पुण्याच्या कचरा डेपो येथे इमारत कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर ४८ तास झाले आहेत तरीही येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरुच आहे. या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली २३ जण अडकले होते. त्यातील आठ जणांना अद्यापही या ढीगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलेले नाही. या कचऱ्याच्या डोंगरातून अनेक विषारी वायूचे उत्सर्जन होत आहे. त्यातच गेले काही दिवस पाऊस सुरु असल्याने बचाव मोहिमेत अडचणी येत होत्या. त्यामुळे एनडीआरएफच्या जवानांना तोंडाला ऑक्सिजन लावून काम करावे लागत आहे.
मोशी कचरा डेपो येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या आत घुसून सुरक्षित मार्ग तयार करण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले आहे. गेल्या ४८ तासांपासून आत मध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. इमारतीच्या बाजूला असलेला मलबा बाजूला करून आता तळमजल्यावरील भिंतीला ड्रिलिंग करून आतमध्ये जाण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार केला गेला आहे. NDRF च्या जवानांनी विविध उपकरणांचा वापर करून हा मार्ग तयार केला असून आता आतमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे.
मिथेन आणि क्लोरीन वायूमुळे अडथळे
मोशी कचरा डेपो दुर्घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्यात कचऱ्याचा प्रचंड ढिगारा, पाऊस आणि मलब्याखाली निर्माण झालेल्या मिथेन आणि क्लोरीन वायूमुळे मोठे अडथळे येत आहेत. त्यामुळे बचाव पथकांकडून अत्यंत खबरदारी घेत टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू आहे. आज कचऱ्याच्या दुसऱ्या बाजूने मार्ग मोकळा करून दुर्घटनाग्रस्त इमारतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. या मार्गामुळे शोध व बचावकार्याला अधिक वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
