
आयपीएल 2026 मिनी लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनवर सर्वाधिक बोली लागली. त्याच्यासाठी जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळाली. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये फक्त 2.75 कोटी रुपये होते. तरीही त्यांनी दोन कोटीपर्यंत बोली लावली. पण कॅमरून ग्रीनची किंमत काय इतक्यावरच थांबणारी नव्हती. त्याच्यासाठी मोठी बोली लागणार याचा अंदाज होता. सुरुवात केकेआरने केली आणि त्याला काही करून संघात घ्यायचा हा चंग बांधला होता. मुंबई इंडियन्सला पहिल्या दोन तीन बोलीतच केकेआरने बाजूला केलं. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जुंपली. पर्समध्ये चांगले पैसे असताना केकेआर मागे हटणारी नव्हती. झालंही तसंच.. शेवटी राजस्थान रॉयल्सला माघार घ्यावी लागली. पण ही बोली इथेच थांबली नाही तर चेन्नई सुपर किंग्सनेही यात उडी घेतली. त्यामुळे बोली 18 कोटींच्या बार केली. पण केकेआरने प्रत्येक बोलीवर वरचढपणा दाखवला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला नमतं घ्यावं लागलं.
कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू कॅमरून ग्रीनसाठी 25.20 कोटींची बोली लावली. यासह आता कॅमरून कोलकात्याच्या संघात सहभागी झाला आहे. आयपीएल इतिहासातील तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतसाठी फ्रेंचायझीने 27 कोटींची बोली लावली होती. तर पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरसाठी 26.75 कोटी बोली लावली होती. आता कॅमरून ग्रीन हा आयपीएल इतिहासातील तिसरा महागडा खेळाडू ठरला आहे. त्यासाठी केकेआरने 25.20 कोटी मोजले आहे. यापूर्वी मिनी लिलावात मिचेल स्टार्कसाठी केकेआरने 24.75 कोटी मोजले होते.2024 साठी हा लिलाव पार पडला होता. तेव्हाच्या पर्वात कोलकात्याने जेतेपद मिळवलं होतं.
💰 INR 25.20 Crore 🤯🤯
The third most expensive player in the history of #TATAIPL auction! 🔨
Cameron Green will play for @KKRiders 💜#TATAIPLAuction pic.twitter.com/c0ErBPWHju
— IndianPremierLeague (@IPL) December 16, 2025
बीसीसीआयच्या नव्या नियमामुळे या बोलीत नवा ट्विस्ट आला आहे. कारण मिनी लिलावात विदेशी खेळाडू सर्वाधिक भाव खाऊन जातात याचा अंदाज होता. म्हणून यंदा नव्या नियमाची भर पडली आहे. विदेशी खेळाडूवर 18 कोटींच्या वर बोली लागली तर त्यांना फक्त 18 कोटीच मिळणार आहे. त्यामुळे कॅमरून ग्रीनला 25.20 कोटी मिळाले तर त्याच्या खात्यात फक्त 18 कोटी जाणार आहे. तर उर्वरित रक्कम ही बीसीसीआयच्या प्लेयर्स वेल्फेयर फंडमध्ये जाणार आहे. हा निधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या प्रगतीसाठी वापरला जाणार आहे.