
आयपीएल 2026 स्पर्धेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. फ्रेंचायझी ट्रेड विंडोच्या माध्यमातून संघाला आवश्यक असलेल्या खेळाडूसाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मिनी लिलावापूर्वीच फ्रेंचायझींमध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. रिटेन्शन लिस्ट जाहीर करण्यापूर्वी संजू सॅमसनबाबत बरीच चर्चा रंगली आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, ही ट्रेड जवळपास निश्चित असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सकडून अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलं आहे. फ्रेंचायझीने संजू सॅमसनला संघात घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.पीटीआयच्या वृत्तानुसार, सीएसकेने संजू सॅमसनबाबत सांगितलं की, सर्वांना माहिती आहे की आम्ही संजू सॅमसनला विकत घेण्यास उत्सुक आहोत. आम्ही ट्रेड विंडोच्या माध्यमातून त्याला घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सने अद्याप काहीच स्पष्टीकरण दिलेलं नाही. कारण त्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं की, ते पर्यायांवर विचार करत आहेत. आम्हाला आशा आहे की संजू सीएसकेकडून खेळेल.
चेन्नई सुपर किंग्सच्या स्पष्टीकरणानंतर फ्रेंचायजी संजू सॅमसनला संघात घेण्यास इच्छुक असल्याचं दिसत आहे. इतकंच काय तर संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजाला संघात घेण्याची इच्छा राजस्थान रॉयल्सने वर्तवल्याचं बोललं जात आहे. पण या बाबत दोन्ही फ्रेंचायझींचं एकमत होतं की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दरम्यान, रिटेन्शन यादी सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. बीसीसीआयने रिटेन्शनाबाबतची शेवटची तारीख नोव्हेंबर निश्चित केली आहे.
संजू सॅमसन आणि राजस्थान रॉयल्स हे समीकरण गेल्या आठ वर्षांपासून आहे. 2018 पासून त्याच्याकडे राजस्थान रॉयल्स संघाची धुरा आहे. त्याच्या कारकिर्दीत राजस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र जेतेपद मिळवण्यात अपयश आलं. 2018 पूर्वी संजू सॅमसन राजस्थानकडून 2013 ते 2015 या कालावधीत खेळला होता. संजू सॅमसन आतापर्यंत 177 आयपीएल सामने खेळला आहे. त्याने 30.94 च्या सरासरीने 4704 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.