GT vs SRH : गुजरात सरस की हैदराबाद वरचढ? आकडे पाहून सांगा कोण जिंकणार?

GT vs SRH Head To Head Records, IPL 2026 : गुजरात विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघांची मंगळवारी आमनेसामने येण्याची आठवी वेळ असणार आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित करण्याची संधी आहे.. जाणून घ्या दोन्ही संघांची एकमेकांविरुद्धची आकडेवारी.

GT vs SRH : गुजरात सरस की हैदराबाद वरचढ? आकडे पाहून सांगा कोण जिंकणार?
GT vs SRH IPL 2026
Image Credit source: Gujrat Giants X and PTI
| Updated on: May 12, 2026 | 9:48 AM

गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी 12 मे रोजी आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 56 वा सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर पॅट कमिन्स याच्याकडे सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 12 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आणखी एका विजयासह प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. अशात आता चाहत्यांना मंगळवारी होणाऱ्या सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने दोन्ही संघांची एकमेकांविरूद्धची आकडेवारी कशी आहे हे जाणून घेऊयात.

गुजरात-हैदराबादपैकी वरचढ कोण?

गुजरात विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघांची मंगळवारी आमनेसामने येण्याची आठवी वेळ असणार आहे. याआधीच्या 7 पैकी सर्वाधिक सामन्यांत गुजरातने विजय मिळवल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. गुजरातने हैदराबादला 7 पैकी 5 सामन्यांत पराभूत केलंय. तर हैदराबादला एकमेव सामनाच जिंकता आला आहे.

दोन्ही संघांची पॉइंट्स टेबलमधील स्थिती

सनरायजर्स हैदराबादने 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. हैदराबादचा नेट रनरेट हा गुजरातपेक्षा चांगला असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा +0.737 असा आहे. हैदराबादने शेवटच्या सामन्यात पंजाबवर 33 धावांनी मात केली आहे. तर गुजरातनेही 11 पैकी 7 सामने जिंकले आहेत. मात्र हैदराबादच्या तुलनेत गुजरातचा नेट रनरेट हा .500 पेक्षा कमी आहे. गुजरातचा नेट रनरेट हा +0.228 असा आहे.

गुजरातला हॅट्रिकची संधी, हैदराबाद रोखणार?

दरम्यान गुजरातला हैदराबाद विरुद्ध सलग तिसरा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची संधी आहे. दोन्ही संघांची 19 व्या मोसमात आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ असणार आहे. मात्र गेल्या हंगामात दोन्ही संघांत 2 सामने झाले होते. तेव्हा गुजरातने हैदराबादला दोन्ही वेळेस पराभूत केलं होतं. गुजरातने 6 एप्रिलला हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर 2 मे रोजी हैदराबादकडे पराभवाची परतफेड करण्याची संधी होती. मात्र हैदराबादने संधी गमावली. गुजरातने त्या सामन्यात 38 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे गुजरात सलग तिसरा सामना जिंकणार की हैदराबाद हिशोब करणार हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us