MI vs RR, Toss : मुंबईने टॉस जिंकला, राजस्थानची बॅटिंग, जसप्रीत बुमराह आऊट
Mumbai Indians vs Rajasthan Royals Toss and Playing 11: राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स विरुद्ध विजय मिळवून वानखेडे स्टेडियममध्ये प्लेऑफचं तिकीट कन्फर्म करण्याचा प्रयत्न असणार आहे. मुंबईने या सामन्यात टॉस जिंकून राजस्थानला बॅटिंगला बोलावलं आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 69 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील 14 वा आणि शेवटचा सामना आहे. सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 3 वाजता टॉस झाला. मुंबईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेत राजस्थान रॉयल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
प्लेइंग ईलेव्हन अपडेट
मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. मुंबईने 1 बदल केला आहेत. प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहच्या जागी दीपक चाहर याला संधी देण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्सच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये नियमित कर्णधार रियान पराग आणि नांद्रे बर्गर या दोघांचं कमबॅक झालं आहे. तर ऑलराउंडर रवींद्र जडेजा याचा इम्पॅक्ट प्लेअरमध्ये समावेश करण्यात आला आहे.
राजस्थानसाठी निर्णायक सामना
आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या 3 संघांनी प्लेऑफचं तिकीट मिळवलंय. तसेच राजस्थानला प्लेऑफमध्ये पोहचायचं असेल तर कोणत्याही स्थितीत त्यांना मुंबई विरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे मुंबईकडे गमावण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे राजस्थानचा प्लेऑफचं तिकीट मिळवण्यासाठी चांगलाच कस लागणार आहे.
मुंबई-राजस्थान दुसऱ्यांदा आमनेसामने
दरम्यान मुंबई आणि राजस्थान दोन्ही संघांची या हंगामात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. राजस्थानने याआधी 7 एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबईवर 27 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबई हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा हिशोब करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजस्थान रॉयल्स प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यशराज पुंजा आणि ब्रिजेश शर्मा.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन: रायन रिकेल्टन (विकेटकीपर), नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, अल्लाह गझनफर आणि रघु शर्मा.