IPL 2026: प्लेऑफच्या शर्यतीत असताना आरसीबीचं टेन्शन वाढलं, नवव्या सामन्यापूर्वी धाकधूक वाढली

आयपीएल 2026 स्पर्धा आता खऱ्या अर्थाने प्लेऑफच्या रंगात रंगली आहे. कारण आता साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून जयपराजयामुळे सर्व उलथापालथ होणार आहे. असं असताना प्लेऑफच्या शर्यतीत असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं टेन्शन वाढलं आहे.

IPL 2026: प्लेऑफच्या शर्यतीत असताना आरसीबीचं टेन्शन वाढलं, नवव्या सामन्यापूर्वी धाकधूक वाढली
IPL 2026: प्लेऑफच्या शर्यतीत असताना आरसीबीचं टेन्शन वाढलं, नवव्या सामन्यापूर्वी धाकधूक वाढली
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 29, 2026 | 3:10 PM

आयपीएल 2026 स्पर्धा आता दुसऱ्या टप्प्यात पोहोचली असून प्लेऑफची रंगत वाढणार आहे. कारण अद्याप कोणत्याही संघाने प्लेऑफमध्ये जागा पक्की केलेली नाही. तसेच दहाही संघांना प्लेऑफची संधी आहे. सध्या पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ टॉप 4 मध्ये आहेत. या संघांचं दोन तीन विजयानंतर प्लेऑफचं तिकीट पक्कं होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ 8 सामने खेळला असून सहा सामन्यात विजय मिळवला आहे. तर 2 सामने गमावले आहे. सध्या 12 गुण आणि +1.919 नेट रनरेटसह दुसर्‍या स्थानावर आहे. दोन सामन्यात विजय मिळवताच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला प्लेऑफचं तिकीट मिळणार आहे. पण असं असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला नवव्या सामन्यापूर्वी धक्का बसला आहे. आयपीएल स्पर्धेतील 42 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स एकमेकांसमोर उभे ठाकतील. 30 एप्रिलला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यासाठी आरसीबीचा स्टार फलंदाज अनुपलब्ध असण्याची शक्यता आहे.

आयपीएल स्पर्धेदरम्यान गेल्या आठवड्यातील सराव शिबिरात फिल सॉल्टला दुखापत झाली होती. त्यामुळे 24 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध आणि 27 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचे सामने खेळता आले नाहीत. पण दिल्लीहून अहमदाबादला रवाना झालेल्या आरसीबीच्या संघात फिल सॉल्ट दिसला नाही. त्यामुळेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात फिल सॉल्ट खेळणार नाही, असे म्हटले जात आहे. माहितीनुसार, फिल सॉल्टने अद्याप नेट्ससोबत सराव सुरू केलेला नाही. सॉल्टची दुखापत गंभीर नसली तरी, संघ त्याच्या बरे होण्याबाबत अतिरिक्त खबरदारी घेत आहे. त्यामुळे, तो पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत खेळू शकेल अशी शक्यता कमी आहे.

फिल सॉल्टच्या गैरहजेरीत इंग्लंडचा युवा खेळाडू जेकब बेथेलला पुन्हा एकदा संघात स्थान मिळेल. त्यामुळे गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि जेकब बेथेल डावाची सुरुवात करण्याची शक्यता आहे. फिल सॉल्ट विराट कोहलीसोबत डावाची चांगली सुरुवात करत होता. त्याला अशक्तपणा आणि पाठीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्याला मैदानाबाहेर बसावे लागले आहे. सॉल्टने या हंगामात आरसीबीसाठी सहा सामन्यांमध्ये 33.66 च्या सरासरीने 202 धावा केल्या आहेत.

Follow Us