IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबला 23 धावांनी नमवलं, आरसीबीने प्लेऑफमध्ये मारली धडक

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्ससमोवर विजयासाठी 222 धावा ठेवल्या होत्या. पण पंजाब किंग्सला काही गाठता आल्या नाहीत.

IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबला 23 धावांनी नमवलं, आरसीबीने प्लेऑफमध्ये मारली धडक
IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाबला धावांनी नमवलं, आरसीबीने प्लेऑफमध्ये मारली धडक
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 17, 2026 | 8:17 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 61वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकात 4 गडी गमवून 222 धावा केल्या आणि विजयासाठी 223 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काय पंजाब किंग्सला गाठता आलं नाही. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग स्वस्तात बाद झाले. त्यात श्रेयस अय्यर फक्त 1 धाव करून तंबूत परतला. त्यामुळे पंजाब किंग्स संघावर दडपण वाढलं. त्यामुळे पराभवाच्या दिशेने कूच सुरू झाली. कूप कोनोलीने 22 चेंडूत 37 धावा केल्या पण बाद झाल्याने संघाची स्थिती नाजूक झाली. सूर्यांश शेडगे 35 धावा करून तंबूत परतला. स्टोयनिस आणि शशांक सिंहने 67 धावांची भागीदारी केली. पण ही जोडी फुटली आणि पराभव निश्चित झाला.

आरसीबीचा डाव

आयपीएल स्पर्धेतील या सामन्यात रजत पाटिदार ऐवजी जितेश शर्माने नेतृत्व केलं. कारण रजत दुखापतग्रस्त असल्याने या सामन्यात खेळला नाही. जेकब बेथेल आणि विराट कोहली यांनी डावाची सुरूवात केली. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 21 धावांची भागीदारी केली. जेकब बेथेल 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी या जोडीने 76 धावांची भागीदारी केली. पडिक्कल 45 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने वेंकटेश अय्यरसोबत डाव पुढे नेला. विराट कोलहीने 37 चेंडूत 58 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यरचा झंझावात पाहायला मिळाला. वेंकटेश अय्यरने 40 चेंडूत नाबाद 73 धावा केल्या. टिम डेविडने 12 चेंडूत 28 धावा केल्या आणि बाद झाला.

आरसीबीची प्लेऑफमध्ये धडक

पंजाब किंग्सला पराभूत करत आरसीबीने प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. 13 पैकी 9 सामन्यात विजय मिळवून 18 गुणांची कमाई केली. या गुणांसह प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला आहे. कारण आरसीबीसह गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडेच 18 गुण करण्याची संधी आहे. त्यात आरसीबीने 18 गुणांची कमाई केली आहे. त्यामुळे टॉप 4 मधील स्थान पक्कं झालं आहे. या पर्वात प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सची स्थिती नाजूक झाली आहे. सलग सहावा पराभव झाल्याने आता प्लेऑफचं गणित चुकलं आहे. आता जर तरच्या स्थितीवर प्लेऑफचं स्थान अवलंबून आहे.

Follow Us