IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सच्या पराभवानंतर कर्णधार श्रेयस संतापला, असं फोडलं खापर
आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सच्या विजयाची गाडी अचानक रुळावरून घसरली. सलग सहा विजयानंतर सलग तीन पराभवांचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर संतापला आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये पंजाब किंग्स सहज जागा मिळवेल असं वाटलं होतं. पण गेल्या तीन सामन्यात झालेल्या पराभवानंतर हे स्वप्न लांबलं आहे. सनरायझर्स हैदराबादच विरूद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर गुणतालिकेतील पहिलं स्थान गमवावं लागलं आहे. खऱं तर टॉप 2 मध्ये राहण्याची पंजाब किंग्सकडे संधी आहे. मात्र तीन पराभवानंतर टॉप 2 मध्ये राहण्याचं स्वप्न भंगते की काय असं आता क्रीडाप्रेमींना वाटू लागलं आहे. पंजाब किंग्सने या स्पर्धेतील दहावा सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पंजाब किंग्सच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण गचाळ क्षेत्ररक्षणामुळे पंजाब किंग्सला मोठी किंमत मोजावी लागली. सनरायझर्स हैदराबादने 20 षटकात 4 विकेट गमवून 235 धावा केल्या आणि विजयासाठी 236 धावा दिल्या. पण या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्स संघ 202 धावा करू शकला. या पराभवानंतर कर्णधार श्रेयस अय्यर चांगलाच संतापलेला दिसला.
पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘हे जरा जास्तच होतं, कारण सुरुवातीला आम्ही झेल सोडले. खेळपट्टी सतत संथ होत होती. त्यांनी सर्वसमावेशक क्रिकेट खेळून सामना कसा जिंकायचा हे आम्हाला दाखवून दिलं. मला वाटतं की स्पर्धेत आमची सुरुवात एखाद्या परीकथेसारखी झाली आहे आणि प्रत्येकजण चांगल्या लयीत होता.. जर आपण याच लयीत खेळत राहिलो, तर त्याचा आपल्याला फायदा होणार नाही. कॉनोली अप्रतिम आहे. त्याची मानसिकता उच्च दर्जाची आहे. दडपणाच्या परिस्थितीत मोठी धावसंख्या उभारण्याची कला त्याला अवगत आहे. चहल ज्या प्रकारे गोलंदाजी करत होता, तो निर्भय होता. मी त्याला आक्रमक खेळायला सांगितलं होतं. विशेषतः जेव्हा नवीन फलंदाज फलंदाजीला आले होते. दुर्दैवाने, आम्ही झेल घेऊ शकलो नाही.’
गुणतालिकेत काय आहे स्थिती?
पंजाब किंग्सची पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सनरायझर्स हैदराबादने सातव्या सामन्यात विजय मिळवून 14 गुणांची कमाई केली आहे. आता प्लेऑफच्या शर्यतीतून फक्त एक विजय दूर आहे. तीन पैकी एका सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमधलं स्थान पक्क होईल. तर पंजाब किंग्स दोन विजय दूर आहे. हैदराबादविरुद्धचा सामना गमावल्याने पदरात 13 गुण आहेत. आता प्लेऑफमध्ये जागा मिळवायची तर चार पैकी दोन सामने जिंकणं भाग आहे. तर 16 गुणांच्या पार जातील आणि प्लेऑफमधील जागा पक्की होईल.