
टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण या संघातून शुबमन गिलला वगळण्यात आलं आहे. तसेच अक्षर पटेलला संधी मिळाली असून त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. दुसरीकडे, रिंकु सिंह आणि इशान किशन यांचं टीम इंडियात कमबॅक झालं आहे. त्याच्या नेतृत्वात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत झारखंड संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्याची आक्रमक खेळी चर्चेचा विषय ठरला होती. इशान किशनला देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत केलेल्या चमकदार कामगिरीसाठी बक्षीस मिळालं आहे.कारण हा वर्ल्डकप भारतात होत आहे आणि इशान चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याची निवड फायदेशीर ठरेल असं निवडकर्त्यांनी सांगितलं आहे.
इशान किशन सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 स्पर्धेत 57 च्या सरासरीने आणि 193 च्या स्ट्राईक रेटने 516 धावा केल्या. या दरम्यान त्याने दोन शतकं आणि दोन अर्धशतं ठोकली होती. त्यामुळे त्याचा विचार करणं निवडकर्त्यांना भाग पडलं. संजू सॅमसन आणि इशान किशन हे दोन विकेटकीपर बॅट्समन म्हणून संघात आहेत. संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळेल यात काही शंका नाही. पण त्याला काही दुखापत वगैरे झाली तर त्याच्या जागी इशान किशनला संघात स्थान मिळू शकते. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मासोबत संजू सॅमसन मैदानात उतरला होता. तसेच संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
इशान किशनचं जवळपास दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालं आहे. इशान किशन 28 नोव्हेंबर 2023 रोजी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तेव्हा गुवाहाटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने 11 ऑक्टोबर 2023 रोजी दिल्लीत शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. इशान शेवटचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. दक्षिण अफ्रिका दौरा अर्धवट सोडून आल्यानंतर त्याला संघात स्थान मिळवणं कठीण गेलं होतं. पण आता दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळून त्याला संघात स्थान मिळालं आहे.