
कोलकाता कसोटीनंतर भारतीय संघ गुवाहाटी कसोटीतही पराभवाच्या वेशीवर आहे. विजयाचं पारडं पूर्णपणे दक्षिण अफ्रिकेच्या पारड्यात झुकलेलं आहे. कारण 549 धावांचं लक्ष्य गाठणं काही भारताला शक्य नाही. कारण या धावांचा पाठलाग करताना भारताने 27 धावांवर 2 विकेट गमावल्या आहेत. आता शेवटच्या दिवशी भारताकडे 8 विकेट असून 522 धावा करायच्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. असं असताना अष्टपैलू रवींद्र जडेजाला या पराभवाचं काहीच सोयरसूतक दिसत नाही. उलट त्याचा विचित्र तर्क ऐकून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या पराभवाने काहीच फरक पडणार नाही, असंही रवींद्र जडेजा सांगून गेला. रवींद्र जडेजा नेमकं काय म्हणाला ते जाणून घेऊयात…
गुवाहाटी कसोटीत रवींद्र जडेजाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं की, ‘मला नाही वाटक की याचा पुढच्या मालिकेवर काही परिणाम होईल. पण एक क्रिकेटपटू म्हणून मी कोणतीही मालिका पराभूत होऊ इच्छित नाही. खासकरून भारतात.. म्हणून मला आशा आहे की आम्ही आमचं सर्वश्रेष्ठ देऊन क्रिकेट खेळू. आम्ही शेवटच्या दिवशी चांगलं देण्याचा प्रयत्न करू. आशा आहे की आम्ही कसोटी सामना वाचवण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी आम्ही सामना ड्रॉ करू शकू. ते आमच्यासाठी फायदेशीर राहील.’
रवींद्र जडेजाने सांगितलं की, भारतीय संघात अनेक युवा खेळाडू आहेत. ते आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या पहिल्या टप्प्यात आहेत. ‘टीममध्ये युवा खेळाडू आहेत आणि ते शिकत आहेत. त्यांचं करिअर आताच सुरु झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला सुरूवात वाटते तितकी सोपी नसते.’ असं जडेजा म्हणाला. इतकंच काय तर पुढे त्याने खेळाडूंच्या अनुभवावर बोट ठेवलं. जेव्हा एखादा संघ घरच्या मैदानावर पराभूत करतो तेव्हा त्यांच्या अनुभवाची उणीव स्पष्ट दिसते. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ही मालिका तरुण खेळाडूंसाठी एक धडा म्हणून काम करेल आणि भविष्यात त्यांना मदत करेल, अशा त्याने कानपिचक्या दिल्या.